Solapur Textile Industry : राजकीय उदासीनतेने वस्त्रोद्योगनगरीच्या चिंध्या

सोलापूरमध्ये तयार होणाऱ्या युनिफॉर्मचे प्रदर्शन भरवण्यास गेली तीन चार वर्षापासून सुरुवात झाली आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दक्षिणेकडील राज्यांकडून सोलापूरला मोठ्या प्रमाणता ऑर्डर मिळतात.
Solapur Textile Industry
Solapur Textile Industry sakal

सोलापूरमध्ये तयार होणाऱ्या युनिफॉर्मचे प्रदर्शन भरवण्यास गेली तीन चार वर्षापासून सुरुवात झाली आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दक्षिणेकडील राज्यांकडून सोलापूरला मोठ्या प्रमाणता ऑर्डर मिळतात. हा व्यवसाय संघटीत झाला पाहिजे. गारमेंट, टॉवेल्स, विडी, दाळमिल यामध्ये जवळपास तीन हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल आहे. सोलापूरमध्ये बनणारा टॉवेल सर्वात उत्तम आहे. सोलापूरचे पाणी जड असल्याने उत्तम टॉवेलची निर्मिती फक्त सोलापुरात बनते. मात्र त्याचे मार्केटींग फारसे होत नाही. अमेरिकन गायक निक जोन्सने सोलापुरी चादरीपासून तयार केलेले जॅकेट घातले होते. त्यामुळे तशाप्रकारच्या जॅकेटला कितीतरी मागणी होती.

सोलापूरविषयी चर्चा करताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच वर्षे सरकार होते, लष्कराची किंवा केंद्र सरकारची किती कामे सोलापुरात पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षांत आणली, राज्य सरकारने किती कामे सोलापूरला दिली, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र सोलापूरच्या वस्त्रनिर्मितीच्या चिंध्या का झाल्या, याचे उत्तर कोणत्याच राजकीय पक्षाकडे नाही.

सोलापूरवर दुष्काळाची छाया अलीकडची नव्हे तर गेली सव्वाशे वर्षे कमी पर्जन्यमान अशीच सोलापूरची ओळख आहे. पण कमी पाऊस, दमट हवा, जड पाणी आणि कुशल कामगार या मुद्दलावर सोलापूरच्या वस्त्रनिर्मितीची यशस्वी गाथा लिहिता आली असती. कोल्हापूरी चप्पलेप्रमाणे सोलापूरच्या चादरीचा ब्रॅंड महाराष्ट्रातील घऱाघरात ज्ञात असला तरी तो ‘ब्रॅंड’ तयार न होण्यामागची जी व्यथा आहे ना तीच या शहराची देखील आहे. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूरमध्ये लष्कराचे कपडे का शिवले जात नाही, असा सवाल उपस्थित करत या प्रश्नाला हात घातला होता. त्याचे उत्तर पाच वर्षानंतरही मिळालेले नाही. मात्र त्यानंतर हा विषय चर्चेला आला आहे. सोलापूर चादरीच्या पलीकडेही वस्त्रोद्योग निर्मितीतला ब्रँड होण्याची क्षमता असताना स्पर्धेत मात्र तो का टिकला नाही, याचे उत्तर शोधण्यात कोणालाच स्वारस्य नाही.

दीडशे वर्षांपूर्वी सोलापुरातील पहिली जुनी गिरणी (सोलापूर स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल) १८७४ ला उभी राहिली होती. मुंबईमध्ये गिरण्यांची भरभराट होत असताना सोलापूर देखील कापडनिर्मितीमध्ये बळ धरत होतं. मुंबईचे कामगारांचे शहर ही बिरुदावली आता नामशेष होऊ लागली असली तरी सोलापूरची मात्र ती कायम आहे. सोलापूरमध्ये अजूनही लाखो कामगार काम करतात. त्यामुळे वस्त्रोद्योगासोबतच कामगारांचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे.

Solapur Textile Industry
Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

कापड गिरण्यांचे अभ्यासक प्रा. चंद्रकांत चव्हाण सांगतात, मुस्लीम राज्यकर्त्यांनी आपली सत्ता स्थापन केल्यानंतर मोमीन हे मुस्लीम विणकर सोलापुरात येऊन राहिले. पेशवेकाळात माधवराव पेशव्यांनी मध्यवर्ती भागात माधव पेठ ही बाजारपेठ वसवली. पुढे ती मंगळवार पेठ म्हणून प्रसिद्ध झाली. तेलंगणमध्ये सातत्याने पडणारा दुष्काळ, पक्क्या मालासाठी उपलब्ध असलेली बाजारपेठ, यामुळे तेथील तेलुगू समाजाचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सोलापुरात झाले. तेलंगणमधील विणकर व तेलुगू भाषिक समाज चरितार्थ चालवण्यासाठी सोलापुरात आला. विडी निर्मितीमध्ये ५० हजार महिला कायमस्वरुपी तर १५ हजार महिला कंत्राटावर काम करतात. विडी उद्योगही असाच तेलंगणातून सोलापुरात तेलुगु लोकांमार्फत आला आहे. पॉवरलूममध्ये ४० हजार कामगार आहेत. रेडीमेड गारमेंडमध्ये ३० हजार कामगार करतात.

कामगार चळवळीमध्ये कायम अग्रणी असणारे आणि सोलापूरमधील विडी कामगारांचे नेते नरसय्या आडाम यांनी यावर भाष्य केले. सोलापूरचे हवामान वस्त्रोद्योगासाठी उत्तम आहे आणि इथे कुशल कामगार आहे. किमान वेतनामध्ये वाढ केल्यास उत्पन्नाचा दर्जा वाढतो. आज बाजारात चीनमधून येणाऱ्या टॉवेल्ससोबत सोलापूरला स्पर्धा करायची आहे. ही स्पर्धा करण्यासाठी उत्पादनाचा दर्जा वाढण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणतात.

सोलापूरमधील वस्त्रोद्योगाची क्षमता नैसर्गिक आहे. कोकणात आंबे पिकतात आणि नागपूरला संत्री पिकतात इतकी ती नैसर्गिक आहे. मात्र बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान आणणे, सरकारी सवलती उपलब्ध करुन देणे, कामगारांना रोजगाराची शाश्वती देणे आणि महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांच्या आणि परदेशातील कपड्यांची मागणी सोलापुरात आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आडम मास्तरांनी व्यक्त केली. पूर्वीपेक्षा ३० ते ३५ टक्के काम कमी झाले आहे. महाराष्ट्र सरकारचे काम सोलापूरला मिळणे जवळपास बंद होऊन ते सुरतला गेले आहे. मात्र दक्षिणेकडील कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगण, आंध्र या राज्यांकडून सोलापूरला मोठी कामे मिळतात.

वस्त्रनिर्मितीपासून कपडे बनवण्यापर्यतचे हजारो लहानमोठे व्यवसाय इथे आहेत. मात्र ७५ टक्के असंघटीत असल्याने या क्षेत्राला बळ मिळण्याची आवश्यकता असल्याचे मत सोलापूर रेडीमेड इंडस्ट्रीचे अध्यक्ष अमित जैन यांनी देखील व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com