
Solapur : नोकरीच्या आमिषाने तिघांची २५ लाख रुपयांची फसवणूक
सोलापूर : केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या प्रकल्पामध्ये नोकरी लावतो म्हणून तिघांची २५ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भातील फिर्याद अल्तमश सिराजअहमद हिरापुरे (वय ३२, रा. संजीवनगर, लक्ष्मीनारायण टॉकीजच्या मागे, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून सूरज रमेश चव्हाण (रा. चन्नम्मानगर, विजापूर रोड, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
केंद्र शासनाच्या कंपनीमध्ये आयटीआय, डिझेल मेकॅनिकल, फिटर, डिप्लोमा, डिग्री, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, एच. टेक., बी. टेक. यासंदर्भातील नोकर भरतीची जाहिरात पाहून जाहिरातीतील मोबाईलवर हिरापुरे यांनी संपर्क केला होता. मोठ्या लोकांसोबत माझे नेहमी उठणे-बसणे असते.
मी दर दोन दिवसांनी मुंबईत मंत्रालय येथे जातो. मोठ्या मंत्र्यांशी माझ्या संबंध आहेत. मी अनेकांना सरकारी व मोठ्या कंपनीमध्ये नोकऱ्या लावल्या असल्याचे सांगून चव्हाण यांनी आमच्याकडून पैसे घेतल्याने हिरापुरे यांनी या फिर्यादीत म्हटले आहे.
चव्हाण यांनी माझ्याकडून पाच लाख ९० हजार रुपये, अजहर मो. आझम शहापुरे (रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) यांना कनिष्ठ इलेक्ट्रिक अभियंता या पदावर नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडून सहा लाख दहा हजार रुपये, इम्रान दाऊद पिरजादे (रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) यांना डिग्रीचे शिक्षण व नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडून सहा लाख ५५ हजार रुपये असे एकूण २५ लाख ५ हजार रुपये घेऊन फसवणूक केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.