सोलापूर : वाहतूक सिग्नल्स लुकलुकताहेत सोयीनुसार!

शहरातील रस्त्यांवर अस्ताव्यस्त पार्किंग, वाहतूक कोंडी; पोलिसांचा दंडात्मक कारवाईवर जोर
Traffic signal
Traffic signalsakal
Updated on

सोलापूर : शहरातील वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चौकातील सिग्नल यंत्रणा महत्त्वाची असते. पण मागील काही महिन्यांपासून पन्नास टक्के सिग्नल्सची लुकलुक बंद आहे. शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी नित्याची बनली आहे. शहर वाहतूक शाखेकडून वारंवार वाहतुकीस शिस्त लावण्याचे प्रयत्न झाले; मात्र त्याला यश येत नसल्याचे दिसून येते. शहरातील उर्वरित पन्नास टक्के सिग्नल्स सोयीनुसार सुरू असल्याचा प्रकारही पाहायला मिळत आहे.

शहरातील चौका-चौकांमध्ये उभे राहून वाहनांच्या नंबर प्लेटचे फोटो काढण्याचा वाहतूक पोलिसांचा कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहे. वाहतुकीचे नियमन आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी असलेल्या शाखेस सध्या मुख्य कामाचा विसर पडला असून, दिवसभर केवळ दंडात्मक कारवाईवर जोर दिला जात आहे. कर्मचारी वाहतुकीला शिस्त न लावता दंड आकारण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र शहरातील प्रत्येक चौकात पाहायला मिळत आहे. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलेला असताना चौका-चौकांमध्ये रिक्षा, वाहने थांबविण्यात येत असल्याने व बेकादेशीर टपऱ्यांमुळे वाहने चालविताना वाहन चालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

शहरातील सिग्नलजवळच वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळे सिग्नल परिसरच बेशिस्त असल्याची परिस्थिती ओढावली आहे. त्यातच नियमबाह्य पार्किंगमुळे वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. शहरात प्रवेश करतानाच वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनधारकांना सामोरे जावे लागते. जुना पूना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणि शहरातील इतर अंतर्गत रस्त्यांवर कुठेही आणि कसेही वाहने उभी केलेली असतात. मात्र हे पाहण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना कदापि वेळ मिळत नाही. मात्र ई-चलन करून दिवसभरातील कारवाईचा आकडा वाढविण्यात आणि वरिष्ठांकडून स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी शाखेतील अधिकारी, कर्मचारी सध्या व्यस्त आहेत.

या चौकांत आहेत सिग्नल्स

भय्या चौक, आम्रपाली चौक, वोडाफोन गॅलरी, जुना बोरामणी नाका, जुना अक्कलकोट नाका, अशोक चौक, महिला हॉस्पिटल, महावीर चौक, पत्रकार भवन, गांधीनगर चौक, रंगभवन चौक, गुरुनानक चौक, डफरीन चौक, संत तुकाराम चौक, आसरा चौक, सरस्वती चौक, सिव्हिल चौक आदी चौकांमध्ये सिग्नल्स आहेत.

अपघाताचा वाढला धोका

शहरातील वाहतूक केवळ सिग्नलच्या भरवशावर सुरू आहे. शहरात ठिकाणी होणारी वाहनधारकांची शर्यत रोखणार कोण, असा प्रश्‍न आता समोर येत आहे. बहुतांश वाहनधारक सिग्नलचे नियम पाळतात तर काही वाहनचालक सिग्नलचे नियम मोडून वाहतूक पोलिसांसमोरूनच वाहने घेऊन निघून जातात. यामुळे नियमभंग होण्याबरोबरच अपघाताचा धोकाही निर्माण होत आहे.

मागील महिनाभरापासून बेशिस्त वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू आहे. शहरातील सिग्नल सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात वाहतुकीची समस्या पूर्णपूर्ण सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- अजय परमार,सहाय्यक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com