ST BUS : सोलापूर-तुळजापूर मार्गावर धावणार दररोज ५० बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST bus

ST BUS : सोलापूर-तुळजापूर मार्गावर धावणार दररोज ५० बस

सोलापूर : शारदीय नवरात्र महोत्सवानंतर कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत असतात. दर्शनानंतर गावाकडे परतणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागातून ७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान ४५० एसटी बस धावणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. यामुळे भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

नवरात्र महोत्सवास सोमवारपासून (ता. २६) सुरवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने सोलापूर विभागातून दररोज ५० गाड्यांचे नियोजन केले आहे. तर ७ ते ११ ऑक्‍टोबरदरम्यान कोजागरी पौर्णिमेसाठी ४५० बसची सोय केली आहे. महामंडळाने तुळजापूर येथील नवीन बसस्थानकावरून वाहतुकीचे नियोजन केले आहे.

सोलापूर- तुळजापूर, तुळजापूर- बार्शी दरम्यान जवळपास १६० बस तर इतर मार्गांवर २९० बस सोडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोजागरी पौर्णिमेसाठी तुळजापुरातील नवीन बसस्थानकातून बसची सोय करण्यात आली आहे. महामंडळातर्फे कर्नाटक, लातूर, सोलापूर यासह विविध मार्गांवर कर्मचारी तैनात केले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.