Solapur : विद्यापीठ अन् महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University

Solapur : विद्यापीठ अन् महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावर

सोलापूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी विविध मागण्यांसाठी २ फेब्रुवारीपासून बोर्ड व विद्यापीठाच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख व प्रमुख सल्लागार डॉ. आर. बी. सिंह यांनी ही घोषणा केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात, सचिव रविकांत हुक्केरी आणि कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दत्ता भोसले, सचिव राजेंद्र गिड्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र गोटे, विद्यापीठ सिनेट सदस्य अजितकुमार संगवे, आनंद व्हटकर, राहुल कराडे, सोमनाथ सोनकांबळे, वसंत सपताळे, कांचन आघाव, मंगेश कुलकर्णी, जाकीर पठाण आदी उपस्थित होते. आंदोलनाचा निर्णय कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयातील संयुक्त कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पाच वर्षांत कर्मचाऱ्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. आंदोलनामुळे उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील परीक्षेची यंत्रणा कोलमडणार असून, त्यासंबंधीची नोटीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना १३ जानेवारीला दिली आहे. सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून पूर्ववत लागू करावेत.

सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा. वेतन आयोगापासून वंचित असलेल्या एक हजार ४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ द्यावा.

विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन लागू झाला, त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी द्यावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता द्यावी. २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा प्रमुख मागण्या आहेत.

आंदोलनाचे टप्पे...

२ फेब्रुवारीपासून विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षा कामकाजावर बहिष्कार

१४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते अडीच वाजता निदर्शने

१५ फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून काम करणे

१६ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप

२० फेब्रुवारीपासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद