Solapur : मोहोळ तालुक्यातील दहा गावासाठी दोनशे कोटीची उपसा सिंचन योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी आमदार राजन पाटील

Solapur : मोहोळ तालुक्यातील दहा गावासाठी दोनशे कोटीची उपसा सिंचन योजना

मोहोळ : मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून अनगर आणि परिसरातील दहा गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकालात काढण्यासाठी "अनगर आणि दहा गावे उपसा सिंचन योजना" ही महत्वाकांक्षी योजना तयार केली असून, ही योजना कार्यान्वीत झाल्यानंतर दहा गावातील सुमारे 25 हजार एकर क्षेत्र ओलिता खाली येणार असल्याची माहिती माजी आमदार पाटील यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले, अनगर सह देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाचीवाडी व चिखली ही गावे कायम दुष्काळी छायेतील गावे आहेत. या परिसरातील शेती केवळ पावसावर अवलंबून आहे. एरवी पावसाळ्यातही या गावाना पिण्याच्या पाण्याची भ्रांत असते. ही अडचण ओळखून माजी आमदार पाटील यांनी वरील गावासाठी उपसा सिंचन योजनेचा आराखडा तयार केला आहे. या योजनेसाठी 0.58 दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे. ही योजना आष्टी उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणात सामाविष्ट असल्याने या योजनेसाठी वेगळे पाणी उपलब्ध करण्याची गरज नाही.तसेच आष्टी उपसा सिंचन योजनेतील पाणीही वापरण्यात येणार नाही. या योजने साठी सुमारे 200 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे.

या गावांच्या उपसा सिंचन योजनेचा मुख्य उद्भव आष्टी तलाव असून, तेथून बंदिस्त जलवाहिन्या टाकून पाणी आणण्याची ही योजना आहे. या सिंचन योजनेचा मुख्य चेंबर खंडाळीच्या माळावर काढण्यात येणार असून, तिथून पाण्याचे वितरण होणार आहे. या योजनेचा सर्वे करण्याचा शासनाचा आदेश प्रस्तावित असून एकूण योजनेची किंमत व सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाने दिला असल्याची माहिती ही पाटील यांनी दिली. या योजनेच्या सर्वेक्षणाचा कालावधी तीन महिन्याचा आहे. ही योजना कार्यान्वीत झाल्यावर या परिसरातील ऊस शेतीसह द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी या फळबागांचे क्षेत्र वाढीस लागणार आहे. तसेच माढा तालुक्याच्या धरतीवर या सिंचन योजनेच्या पाण्याद्वारे पाझर तलाव, बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे वाया जाणारे पाणी वापरात येणार असून विहिरी व बोअर यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.यावेळी आमदार यशवंत माने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थीत होते.