Solapur : जड वाहनांसाठी ताशी २० किमी वेगमर्यादेचे बंधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जड वाहनांना बंदी

Solapur : जड वाहनांसाठी ताशी २० किमी वेगमर्यादेचे बंधन

सोलापूर : शहरातील वाहनांच्या तुलनेत रस्ते कमी पडू लागले आहेत. त्यामुळे जड वाहनांना दिवसा परवानगी नाकारलेली आहे. तरीपण, अत्यावश्यक सेवेतील कामांसाठी शहर पोलिसांकडून १२४ जड वाहनांना विशेषत: टिप्परला परवानगी देण्यात आली आहे. पण, त्या वाहनांची वेगमर्यादा ताशी २० किलोमीटर एवढीच असावी, अशी अट घालण्यात आली आहे.

शहर वाहतूक शाखेचे मनुष्यबळ वाढविणे काळाची गरज असून, त्याशिवाय वाहनचालकांचा बेशिस्तपणा कमी होणार नाही. दुसरीकडे, वाहतूक पोलिसांनी वाढते अपघात रोखण्यासाठी पारदर्शकपणे सातत्याने कारवाई करण्याची गरज आहे. जुना पूना नाका, ॲम्बेसिडर हॉटेल, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीवेस पोलिस चौकी, सरस्वती चौक, शांती चौक, जुना बोरामणी नाका, बाजार समिती चौक,

आसरा चौक, सिव्हिल व पोटफाडी चौक, जुना तुळजापूर नाका (भवानी पेठ) या ठिकाणांवर प्रामुख्याने वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सोलापूरकरांनी व्यक्त केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अवैधरीत्या रक्कम स्वीकारून त्यांना सोडून देऊ नये.

दुसरीकडे, महापालिकेने रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी ठोस कार्यवाही करायला हवी, अशीही नागरिकांची अपेक्षा आहे. तसेच परवानाधारक जड वाहनांना वर्दळीच्या रस्त्यांवरून नव्हे तर कमी वाहने असलेल्या रस्त्यांवरूनच ये-जा करण्याची परवानगी असावी; जेणेकरून अपघात कमी होतील, असा विश्वास सर्वसामान्यांना आहे.

महापालिकेला वारंवार पत्र, तरीही कार्यवाही शून्य

शहरातील बहुतेक रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून, अनेक ठिकाणी रस्त्यांलगतच मंडई थाटण्यात आली आहे. रस्त्यांवरच हातगाडे उभारले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताची शक्यता निर्माण होत असल्याने संबंधित ठिकाणी ठोस कारवाई करावी,

असा पत्रव्यवहार अनेकदा शहर वाहतूक शाखेने महापालिकेला केला. तसेच जुना बोरामणी नाका, शांती चौक, अशोक चौक, गुरुनानक चौक मार्गे महावीर चौक या रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशीही मागणी वाहतूक पोलिसांनी केली. शहरातील १९ सिग्नलपैकी काही सिग्नल बंद असून त्यांची दुरुस्ती करावी, असेही पत्र पाठवले. पण, ठोस कार्यवाही काहीच केली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

शहरातील मुख्य रस्ते व मुख्य बाजारपेठांमधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात महापालिकेला सातत्याने पत्राद्वारे मागणी केली. पण, कार्यवाही होत नसल्याने वाहतुकीला रस्ता अपुरा पडतो. अनेक मंडई रस्त्यांलगत असल्याने देखील अपघाताला निमंत्रण मिळत असून, शहरातील पार्किंगचा देखील प्रश्न जागांअभावी अजूनपर्यंत सुटलेला नाही.

- अजय परमार, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर (वाहतूक)