सोलापूर : नऊशे कोटींचा विजयपूर ‘बायपास’ खचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

सोलापूर : नऊशे कोटींचा विजयपूर ‘बायपास’ खचला

सोलापूर : सोलापूर शहरातून जाणारी जड वाहतूक बंद व्हावी, विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून केगाव (शिवाजीनगर) ते हत्तूर असा ९०० कोटी रुपयांचा २२ किलोमीटरपर्यंत विजयपूर बायपास तयार केला गेला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अडीच महिन्यांपूर्वी त्याचे लोकार्पणही केले. मात्र, सध्या या बायपास मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, केगावजवळ सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर मोठ्या भेगा पडल्याची बाब समोर आली आहे.

सोलापूर-विजयपूर महामार्ग झाल्यानंतरही सोलापूर शहरातून अवजड वाहनांना प्रवास करता येत नव्हता. त्या वाहनांची समस्या सुटावी, शहरातील जड वाहतुकीमुळे होणारे अपघात कमी व्हावेत म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगावजवळून बायपास करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. केगाव ते हत्तूर हा बायपास सुमारे ९०० कोटी रुपयांचा आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याचे काम सुरू झाले आणि मार्च २०२२ मध्ये त्याचा लोकार्पण सोहळादेखील पार पडला.

आता या बायपासमुळे शहरात जड वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी थांबेल, असा विश्वास सर्वांनाच होता. मात्र, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे वाहनधारक त्या बायपासवरून प्रवास करायला घाबरत असल्याची स्थिती आहे. सोलापूर शहरातून बायपासला जाताना व बायपासवरून शहराकडे येणारा रस्ता अक्षरश: उखडला आहे. पाच वर्षांत पूर्ण झालेल्या बायपासवर अडीच महिन्यांतच खड्डे पडल्याने आता या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

रस्त्याला पुलाजवळच भेगा

केगाव ते हत्तूर या सोलापूर-विजयपूर बायपासवरून अजूनही म्हणावी तेवढी वाहतूक सुरू झालेली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या बायपासचे लोकार्पण करून अडीच महिनेही झाले नाहीत तोवर बायपासच्या सुरवातीलाच पुलाजवळील रस्ता खचला आहे. मोठ्या भेगा पडल्याने त्या ठिकाणी बॅरिकेड्‌स लावून डागडुजी करण्यात आली. मात्र, अजूनही कायमस्वरूपी उपाय केलेला नाही, हे विशेष.

महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

सोलापूर-हैदराबाद महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी पुलांचे काम सुरू झालेले नाही. अजूनही महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना खड्ड्यांचा त्रास सोसावाच लागतोय. विशेष बाब म्हणजे, या महामार्गाचे काम अर्धवट असतानाही वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात आहे. सोलापूर-विजयपूर बायपासवर लोकार्पणानंतर अडीच महिन्यांतच खड्डे व भेगा पडल्याने महामार्गाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बायपासची स्थिती

एकूण अंतर ः २२ किलोमीटर

कामाचा कालावधी ः नोव्हेंबर २०१८ ते मार्च २०२२

बायपासची अंदाजित किंमत ः ९०० कोटी

Web Title: Solapur Vijaypur Bypass Costing Nine Hundred Crores

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..