
सोलापूर : देवडी ला आष्टी उपसा सिंचन योजनेतुन पाणी द्या ;पवार यांच्याकडे मागणी
मोहोळ : देवडी ता मोहोळ चा गावाला आष्टी उपसा सिंचन योजनेतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे, त्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश व्हावेत अशी मागणी सरपंच उपसरपंच यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, देवडी हे गाव सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचे गाव असून कायम अवर्षण क्षेत्रांमध्ये असते. त्यामुळे गावाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. गावची लोकसंख्या 4 हजार 500 असून सोळाशे हेक्टर क्षेत्र आहे.देवडी ला आष्टी उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळाले तर हे क्षेत्र संपूर्ण बागायती होणार आहे. सध्या पाण्याची जमिनीतील पातळी खूप खालावली असल्याने पावसाळ्याच्या जीवावरच शेती करावी लागते. केवळ एका पिकावरच समाधान मानावे लागते.त्यामुळे जनावरे संभाळणे अडचणीचे आहे. गावाला पाणी नसल्याने अनेक गावकरी रोजी रोटी साठी पुणे,मुंबई या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत.
पाण्याच्या अडचणीमुळे येथील शेतकरी हे दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत, मात्र दररोज जनावरांना पिण्यासाठी लागणारे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने तोही व्यवसाय अडचणीत आला आहे. देवडी गावाजवळुन आष्टी उपसा सिंचन योजनेचा कालवा गेला आहे, या योजनेत पूर्वी देवडी चा समावेश होता,मात्र प्रशासकीय पातळीवरून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने तो प्रश्न तसाच मागे पडला. पावसाळ्यात उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. तेच पाणी आष्टी तलावात सोडून व आष्टी उपसा सिंचन योजनेतून देवडी परिसरातील पाझर तलाव, लहान लहान बंधारे भरून दिले तरीही पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. यावेळी सरपंच वैभव कांबळे, ग्रामसेवक सुरेश साठे, नागेश थोरात आदी सह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Solapur Water Ashti Upsa Irrigation Scheme
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..