
Solapur : एक कोटी आणल्याशिवाय नीट नांदवणार नाही
सोलापूर : माहेरून एक कोटी रुपये घेऊन ये, सोलापुरात पॉवरलूम फॅक्टरी खरेदी करून व्यापार धंदा करतो] म्हणून पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. या प्रकरणी श्रावणी प्रेम पोटाबत्ती (रा. पद्मा नगर) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, श्रावणी यांचा डिसेंबर २०२० मध्ये अक्कलकोट रोडवरील प्रेम श्रीनिवास पोटाबत्ती यांच्यासोबत विवाह पार पडला. विवाहानंतर काही दिवसांनी हरियाना येथे राहायला असताना पतीने माहेरून एक कोटी रुपये आण म्हणून छळ सुरु केला.
‘मला तु पसंत नव्हती, तुझा पगार व तुझ्या वडिलांची आर्थिक मदत होईल’ या हेतूने विवाह केल्याचे सासरच्यांनी श्रावणी यांना सांगितले. त्यानंतर सोलापुरात आल्यावरदेखील वडिलांकडून एक कोटी रुपये आण, एमआयडीसीत एक पॉवरलूम खरेदी करू, असा तगादा लावला. विवाहात २० तोळे सोने देतो म्हणून १५ तोळेच दागिने दिले आहेत.
आता वडिलांची अब्रू जाऊ नये असे वाटत असल्यास आणि तुला नांदायचे असल्यास आर्थिक मदत करावीच लागेल, अशी दमदाटी केली. पैसे आणल्याशिवाय आम्ही नीट नांदवणार नाही, असेही सासरच्यांनी म्हटल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
श्रावणी यांच्या फिर्यादीवरून पती प्रेम पोटाबत्ती, सासरा श्रीनिवास पोटाबत्ती व सासू ज्योती पोटाबत्ती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार नीलेश साळुंखे तपास करीत आहेत.