esakal | "मी शिवसेनेचाच' म्हणणाऱ्या सोलापूर झेडपी अध्यक्षांची झाली पंचाईत ! 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

सध्या दिवाळीच्या सुट्टी असल्यामुळे मी माझ्या गावाकडे आहे. मी गावाकडे असल्यामुळे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या बैठकीला मी येऊ शकलो नाही. 
- अनिरुद्ध कांबळे, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषद 

"मी शिवसेनेचाच' म्हणणाऱ्या सोलापूर झेडपी अध्यक्षांची झाली पंचाईत ! 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : राज्यात मुख्यमंत्रीपदापासून भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. राज्यात यशस्वी झालेला हा राजकिय प्रयोग मात्र सोलापूर जिल्हा परिषदेत मात्र यशस्वी होऊ शकला नाही. सोलापुरातील शिवसेनेच्या सदस्यांनी विशेषता करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले. राज्यातील शिवसेना भाजपसोबत लढत असताना सोलापुरातील शिवसेना (माजी आमदार नारायण पाटील गट) मात्र भाजपसोबत झेडपीच्या सत्तेत आहे. 

राज्याच्या सत्तेत शिवसेना आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद असल्याने मुंबईत गेल्यावर मी तुमचाच आहे असे शिवसेना नेत्यांना ठणकावून सांगणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची मात्र आता राजकिय कोंडी झाली आहे. भाजपचे नेते सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर आवर्जून उपस्थित राहणारे कांबळे पदवीधरच्या निवडणुकीत मात्र चार हात लांब राहू लागले आहेत. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची उमेदवारी सांगली येथील अरुण लाड यांना देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना झेडपी अध्यक्ष कांबळे मात्र प्रचारापासून दूर असल्याने अध्यक्ष कांबळे कोणाचे? शिवसेनेचे की भाजपच्या विचाराच्या आघाडीचे? हा प्रश्‍न समोर येऊ लागला आहे. 

पदवीधरचे उमेदवार लाड यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांपूर्वी सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष व इतर घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह कॉंग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, संभाजी शिंदे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाईचा कवाडे गट या प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला हजेरी लावली. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. अनिरुद्ध कांबळे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यामध्ये भाजप व भाजप पुरस्कृत असलेल्या स्थानिक आघाड्यांमधील सदस्यांचा मोठा वाटा आहे. पदवीधरच्या या निवडणुकीत भाजपने सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. आपण लाड यांच्या प्रचाराला गेलो तर आपली राजकीय कोंडी होऊ शकते? याचाच अंदाज कदाचित अनिरुद्ध कांबळे यांना आल्याने त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली असल्याचे समोर येत आहे. 

मुख्यमंत्री ठाकरेंच्या फोटोची चर्चा 
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आतापर्यंत निवड झालेल्या बहुतांश अध्यक्षांनी आपल्या राजकिय गॉडफादरचा फोटो आपल्या दालनात लावला आहे. या दालनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील आजी-माजी नेत्यांचे फोटो आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद कांबळे यांच्या माध्यमातून भाजपच्या मदतीतून मिळाले आहे. या दालनात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो नसल्याची चर्चा प्रसार माध्यमांसह शिवसैनिकांमध्ये झाली. त्यानंतर अध्यक्ष कांबळे यांनी ठाकरे यांचा फोटो आपल्या दालनात लावला.

loading image