Solarpur News: मोहोळ पोलिसांनी चोरीस गेलेल्या एक कोटी पंधरा लाखाचे ट्रॅक्टर तीन दिवसात हस्तगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solarpur News

Solarpur News: मोहोळ पोलिसांनी चोरीस गेलेल्या एक कोटी पंधरा लाखाचे ट्रॅक्टर तीन दिवसात हस्तगत

मोहोळ : तालुक्यासह माढा, पंढरपूर, बार्शी या ठिकाणाहून चोरीस गेलेले तेरा ट्रॅक्टर व नऊ ट्रेलर यांच्यासह एक ब्लोअर यंत्र असा एकूण एक कोटी पंधरा लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या तीन दिवसात हस्तगत करून, तिघा संशयतांना अटक केली आहे.

मोहोळ पोलीस ठाणे स्थापनेपासून व जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. दरम्यान गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कामगिरी करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा मोठा तुरा खोवला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी मंगळवारी मोहोळ येथे येऊन

उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन माने, पोलीस नाईक अमोल घोळवे, प्रवीण साठे, सिद्धनाथ मोरे, महिला पोलीस नाईक अनुसया बंडगर यांचा गुलाब हार व फेटा देऊन सत्कार केला.

दरम्यान या कामगिरी बद्दल गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरील चौघा कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले, तर 35 हजार रुपयांचे रोख रिवॉर्ड पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी घोषित केले.

या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार,सन 2018 पासुन माढा, पंढरपूर, बार्शी व मोहोळ या तालुक्यातील ट्रॅक्टर चोरीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मात्र संशयीतांचा शोध लागत नव्हता.

संशयीतांनी संपूर्ण जिल्हया समोर मोठे आवाहन उभे केले होते. पप्पू कुबेर ओव्हाळ, उत्कर्ष उर्फ सोन्या नागनाथ पवार, बंडू कुमार पवार सर्व रा. खरसोळी ता पंढरपूर हे जो ट्रॅक्टर चोरावयाचा आहे त्याच्या चालका बरोबर सलगी वाढवायचे. हे टोळके साखर कारखाना परिसरात हेरगिरी करत असत.

चालकाशी सलगी वाढवून त्याच्या दिवसभराच्या कामकाजाची बारीक-सारीक माहिती घेत. चालक ट्रॅक्टर सोडून किती वेळ जातोय याचा अभ्यास करत व ट्रॅक्टर चालकास फसवून ट्रॅक्टर हातोहात चोरून नेत. चोरून नेलेल्या ट्रॅक्टरच्या चेसीचा नंबर ग्राइंडरच्या साह्याने घासून टाकत असत, व मेकॅनिकच्या साह्याने कागदपत्रे आणून देतो असे सांगून विक्री करत असत.

ट्रॅक्टर चोरीच्या तक्रारी वाढल्या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी भारती, पोलीस निरीक्षक सायकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली. पहिल्या पथकांने चोरीचे ट्रॅक्टर शोधावयाचे तर दुसऱ्या पथकाने ते पोलीस ठाण्यात आणावयाचे.

एक ट्रॅक्टर ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणाहून पोलीस ठाण्यात आणणे हे खूप जिकिरीचे काम होते, मात्र तेही पोलिसांनी पार पाडले. दरम्यान चोरीचे ट्रॅक्टर सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली व चोरीला गेलेल्या ट्रॅक्टर मालकांनी मोहोळ पोलीस ठाण्यात आपला ट्रॅक्टर आहे का हे पाहण्यासाठी एकच गर्दी केली.

वाहन चोरी व अपघातावर लक्ष केंद्रित करणार

पोलीस अधीक्षक सरदेशपांडे म्हणाले, जिल्ह्यात वाहन चोऱ्या व अपघातांचे प्रमाण मोठे आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून त्यांचा छडा लावणार आहे. अनेक शेतकरी विविध बँकांची कर्जे घेऊन ट्रॅक्टर विकत घेतात मात्र अशा चोऱ्या झाल्या तर त्यांचा पूर्ण प्रपंच उध्वस्त होतो.

ज्यांचे ट्रॅक्टर सापडले आहेत त्यांच्या कडून ओळख पटवून विनासायास त्यांच्या ताब्यात देणार असल्याचे अधीक्षक सरदेशपांडे यांनी सांगितले.या कामगिरीचा संपूर्ण जिल्ह्याला आनंद झाला

असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रात्री नऊ ते एक वाजेपर्यंतची गस्त वाढविणार असून त्यासाठी महामार्ग पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. अपघात कमी होण्यासाठी ब्लॅकस्पॉट निश्चित केले असून,

त्यांचा अभ्यास केला आहे. यावेळी पहिला ट्रॅक्टर सापडलेल्या ट्रॅक्टर मालका कडून अधीक्षक सरदेशपांडे अप्पर अधिक्षक जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोहोळ पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.