esakal | सफाईसाठी झाडू घेतलेल्या हातात लेखणी! अण्णाभाऊंच्या जीवनप्रवासावर लिहून गायली चार गीते
sakal

बोलून बातमी शोधा

सफाईसाठी झाडू घेतलेल्या हातात लेखणी!

हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करणाऱ्या नीता देवकुळे या सफाई कामगार महिलेने त्याच हातात लेखणी घेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चार गीतांची रचना केली आहे.

झाडू घेतलेल्या हातात लेखणी! अण्णाभाऊंवर लिहून गायली चार गीते

sakal_logo
By
किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : उदरनिर्वाहासाठी माढा नगरपंचायतीकडे (Madha Nagar Panchayat) दररोज पहाटेपासून हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करणाऱ्या नीता देवकुळे (Neeta Devkule) या सफाई कामगार महिलेने त्याच हातात लेखणी घेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या जीवनावर आधारित चार गीतांची (Songs) रचना केली आहे. ती गीते स्वतः गायली आहेत. आकाशवाणीसह इतर अनेक ठिकाणी नीता देवकुळे यांच्या गाण्यांचे सादरीकरण झाले असून, त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या विविध कंपन्यांच्या सीडीही उपलब्ध झाल्या आहेत.

हेही वाचा: उद्योजक बनविणारा उद्योजक! प्रतिकूल परिस्थितीत उभारल्या पाच कंपन्या

"जग बदल घालूनी घाव सांगुनी गेले मज भीमराव' या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या गीतातील ओळींची प्रचितीच नीता देवकुळे यांच्या रूपाने मिळत असून, एखादी कला शिकण्यासाठी साधनांपेक्षा साधनेची जास्त गरज असल्याचे नीता देवकुळे यांच्या या खडतर प्रेरणादायी प्रवासातून दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने त्यांना सन्मानित करून प्रोत्साहित केले आहे.

नीता देवकुळे या माढा नगरपंचायतीकडे सफाई कामगार म्हणून काम करत आपला प्रपंच चालवतात. पहाटेपासूनच माढा शहरातील सफाईचे काम, घरची कामे या सगळ्या कामांतून सवड काढून गीते, अभंग, गवळणी, नामकरणाचे पाळणे, मंगलाष्टक, जात्यावरच्या ओव्या यासह समाजप्रबोधनपर गीतांचे गायन यांसारखे कार्यक्रम करतात. हुंडा प्रथा बंद व्हावी, स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी नीता देवकुळे या गीत गायनातून प्रबोधन करतात. नीता देवकुळे यांनी गीत गायनाचा वारसा व धडे मामा मारुती देवकुळे, आई यशोदा व भाऊ शाहीर बापू पवार यांच्याकडून मिळाला असून पती गौतम देवकुळे, वडील उत्तम पवार, भाऊ भगवान पवार यांनी मोठे प्रोत्साहन दिले आहे. अर्थात यापैकी कोणाचेही शास्त्रीय शिक्षण तर सोडाच पण स्थानिक स्तरावरूनही कोणाकडून शिक्षणही घेतले नाही. स्वतःची आवड सांभाळण्यासाठी स्वतःच शिकत गेल्या. नीता देवकुळे यांचे केवळ चौथीपर्यंत शिक्षण झाले आहे. तरीही मुलगा नीलेश याला वादन कलेत तरबेज बनवले असून दुसरा मुलगा सुमीतकुमार पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्यांनी हातातील झाडूलाच लेखणी बनवत प्रेरणास्रोत असणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनप्रवासावर आधारित "असा आहे का विद्वान सांग शोधून रं बाळा अण्णाभाऊ शिकलारं दीड दिवसाची शाळा', "शाहिरा शाहिरा घे मानाचा हा मुजरा', "लेखणीचे राजे अण्णाभाऊ माझे', "फकिराने ओटी भरली तेव्हा तू जगलास' या चार गीतांची रचना स्वतः केली असून ही गीते गायलीही आहेत.

हेही वाचा: जगण्यासाठी 'प्लॅन ए' अन्‌ छंदासाठी 'प्लॅन बी'!

नीता देवकुळे यांनी गायलेली गीते आरेंज कॅसेट कंपनी, यू-ट्यूब चॅनेल, लोकप्रबोधनी कला मंच, पिंपरी चिंचवड यांनी सीडी रूपात उपलब्ध करून दिली आहेत. आकाशवाणी सोलापूर, पुणे केंद्रावर वर्षातून दोनवेळा लोकसंगीत या कार्यक्रमात देवीची गाणी, अभंग, गवळणी यांचे गायन नीता देवकुळे करतात. त्यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा 2016-17 चा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागानेही त्यांचा गौरव केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 2014-15 चा पुरस्कार मिळाला आहे. स्थानिक पातळीवर माढ्यातील रोटरी क्‍लबने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले तसेच श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, माढा जगदंबा सांस्कृतिक मंडळाने नीता देवकुळे यांना सन्मानित केले.

करिअर करताना आज अनेकजण यश- अपयशाचा सामना करत आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या शब्दात सांगायचे झाल्यास "नैराश्‍य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते' त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती, संधीचा अभाव, साधनांचा अभाव, अपयश यांसारख्या नैराश्‍यवादी गोष्टींची धूळ बाजूला सारत तरुणांनी नीता देवकुळे यांच्या जीवनप्रवासाकडे एक प्रेरणा म्हणून पाहावे.

आजही गीतांचे लेखन करणाऱ्या नीता देवकुळे यांचे हात शहरात सफाईचे काम करत शहर स्वच्छ ठेवत असून, त्यांच्यासह माढा नगरपंचायतीकडे असणाऱ्या सफाई कामगार महिलांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याची अपेक्षा आहे.

loading image
go to top