esakal | उद्योजक बनविणारा उद्योजक! प्रतिकूल परिस्थितीत उभारल्या पाच कंपन्या
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योजक बनविणारा उद्योजक! प्रतिकूल परिस्थितीत उभारल्या पाच कंपन्या

कदम यांनी 41 व्यक्तींना उद्योजक बनवले असून, उद्योजक बनवणारे उद्योजक, अशीच त्यांची सध्या ओळख झाली आहे.

उद्योजक बनविणारा उद्योजक! प्रतिकूल परिस्थितीत उभारल्या पाच कंपन्या

sakal_logo
By
किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : लहानपणापासूनच कमालीचा संघर्ष करत भाजीपाला विकून व्यवसायाची मूलभूत कौशल्ये आत्मसात (Skill development) केली. आकुंभे (ता. माढा) (Madha Taluka) येथील केमिकल इंजिनिअर (Chemical Engineer) मनोज रावसाहेब कदम (Manoj Kadam) यांनी वयाच्या 32 व्या वर्षीच अमेरिकन कंपनीतील जनरल मॅनेजरपदाची नोकरी (Jobs) सोडून स्वतःच्या पाच कंपन्या स्थापन केल्या. केंद्र शासनाच्या कौशल्य व उद्यमशीलता मंत्रालयाचा (Ministry of Skills and Entrepreneurship) पहिला राष्ट्रीय युवा उद्योजक पुरस्कार (National Young Entrepreneur Award) प्राप्त केला. 21 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या कंपनीला प्राप्त झाले आहेत. कदम यांनी 41 व्यक्तींना उद्योजक बनवले असून, उद्योजक बनवणारे उद्योजक, अशीच त्यांची सध्या ओळख झाली आहे. मनोज कदम यांच्या या यशामागचा खडतर प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

हेही वाचा: आता कारची चोरी होणारच नाही! 'ऑर्किड'ने शोधली भन्नाट सिस्टीम

मनोज कदम यांनी प्राथमिक शिक्षण वरवडे (ता. माढा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेच्या कामवा- शिका योजनेतून पूर्ण केले. शिक्षण घेताना घरची परिस्थिती बेताची असल्याने गाई-म्हशींच्या धारा काढणे, शेतातील भाजीपाला घेऊन सकाळीच सायकलवरून 24 किलोमीटरचा प्रवास करत आकुंभेहून टेंभुर्णीला मंडईत जाऊन भाजी विकणे, पुन्हा घरी येऊन तीन भावंडांना घेऊन एकाच सायकलवरून आकुंभेवरून सोळा किलोमीटरचा प्रवास करत वरवडे येथे शाळेस जाणे, असा दररोजचा चाळीस किलोमीटर सायकल प्रवासाचा त्यांचा दिनक्रम होता. अकरावी व बारावीचे शिक्षणही स्वकष्टाने सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयात घेतले. वारणा येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग अँड टेक्‍निकल इन्स्टिट्यूट या महाविद्यालयात त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना पैशासाठी खाणावळीत काम केले. तिथल्या हिशेबाच्या कामाने व भाजी मंडईत विकलेल्या भाजीपाल्यामुळे व्यवहार ज्ञानाची कौशल्ये प्राप्त झाली. त्याचा पुढे उद्योगात उपयोग झाला.

पदवी व पदव्युत्तर शिक्षणात ते विद्यापीठात प्रथम आल्याने गोल्ड मेडलिस्ट ठरले. शिक्षण घेताना त्यांना पैशाची चणचण व आपल्या तीन भावंडांच्या शिक्षणाची काळजी होती. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले होते. त्यामुळे शिक्षणानंतर नोकरी पत्करली. 13 देशांमधील विविध कंपन्यांमध्ये विविध पदांवर नोकरी केली. एका अमेरिकन कंपनीच्या जनरल मॅनेजरपदाच्या नोकरीनंतर मनोज कदम यांनी राजीनामा दिला व स्वतःची एस. व्ही. इंजिनिअरिंग आणि कन्सल्टन्सी ही तांत्रिक सल्लागार व उद्योग उभारणी कन्सल्टन्सी कंपनी औरंगाबाद येथे उभारली. या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आसाम, ओरिसा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांत तसेच जपान, टांझानिया या देशात 35 हून जास्त प्रकल्प सुरू आहेत. ही कंपनी देशातील व परदेशातील नामांकित फार्मास्युटिकलसह इतर कंपन्यांची कन्सल्टंट आहे. शिवाय सॅव्हम ऍग्रो फुडेक्‍स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी विषमुक्त शेतीचा उद्देश ठेवून काम करत आहे. सिल्व्हर ओक फिल्म्स अँड एंटरटेन्मेंट या चित्रपटनिर्मिती कंपनीचा चित्रपटही अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय औरंगाबादमध्ये व सोलापूर येथे एस. व्ही. बुल कन्स्ट्रक्‍शन अँड इक्विपमेंट शोरूमही आहेत. एस. व्ही. इंजिनिअरिंग क्‍लिनरूम अँड हॅवॅक सोल्यूशन्स ही कंपनीही काम करत आहे.

हेही वाचा: मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा! मिळणार 'या' दिवसापासून विंडोज 11 अपडेट

मनोज कदम यांच्या कामात पत्नी अश्विनी, दोन इंजिनिअर भाऊ सुदर्शन, विश्वजित, भाऊ सुकुमार, इंजिनिअर मेव्हणा अभिजित मोरे यांचे सहकार्य आहे. याशिवाय ते मुलींचे शिक्षण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नवद्योजकांना व तरुणांना उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन करतात. केंद्र शासनाच्या कौशल्य व उद्यमशीलता मंत्रालयाच्या उद्योग विषयक सल्लागार मंडळात मनोज कदम यांचा समावेश आहे.

"ती' सायकल आजही जपून ठेवली

एकाच सायकलवरून चौघे भावंडे शाळेला जाताना गावातील लोक त्याला सर्कस म्हणत. मनोज कदम यांच्या दररोजच्या चाळीस किलोमीटरच्या प्रवासाला साथ देणारी सायकल त्यांनी आजही जपून ठेवली आहे. सायकल प्रवासाच्या या सर्कशीचे आता कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या पाच कंपन्यांत रूपांतर झालं असून, कंपन्यांच्या यशस्वीतेवर केंद्र सरकारच्या पुरस्कारासह इतर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय 21 पुरस्कारांची मोहर उमटली आहे.

loading image
go to top