esakal | सोनके-तिसंगी तलाव ओव्हरफ्लो! 12 गावे व परिसराचा पाणीप्रश्न मिटला
sakal

बोलून बातमी शोधा

सोनके-तिसंगी तलाव ओव्हरफ्लो! 12 गावे व परिसराचा पाणीप्रश्न मिटला

पंढरपूर तालुक्‍यातील सोनके-तिसंगी तलाव शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे.

सोनके-तिसंगी तलाव ओव्हरफ्लो! 12 गावांचा पाणीप्रश्न मिटला

sakal_logo
By
संजय हेगडे

तिसंगी (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील (Pandharpur Taluka) सोनके-तिसंगी तलाव (Sonke-Tisangi Lake) शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे तलाव परिसरातील शेतकऱ्यांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने आनंदाचे वातावरण आहे. सध्या हा तलाव पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होऊन सांडव्याद्वारे पाणी वाहू लागले आहे. तलाव शंभर टक्के भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. या तलावातील पाण्याचा लाभ तिसंगी, सोनके, गादेगाव, उपरी, वाखरी, भंडीशेगाव, शेळवे, कौठाळी, खेडभाळवणी, पळशी, शिरढोण या भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे.

हेही वाचा: नागझरी नदीपात्रातून दहिटणे हद्दीत 25 लाख किमतीची वाळूचोरी

सोनके-तिसंगी मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 26.16 द.ल.घ.मी., मृत पाणीसाठा 1.69 द.ल.घ.मी., उपयुक्त पाणीसाठा 24.47 द.ल.घ.मी., तळ संचय पातळी 297.25 मीटर, पूर्ण संचय पातळी 306.62 मीटर, तलाव माथा पातळी 309.45 मीटर आहे. सोनके-तिसंगी तलाव वीर-भीटघर धरणातील ओव्हरफ्लो पाण्याने भरला जातो. धरण परिसरात सलग दोन वर्ष समाधानकारक पाऊस झाल्याने तलाव भरण्यासाठी अडचण येत नाही. तलाव शंभर टक्के भरल्याने परिसरात हजारो एकर बागायती क्षेत्र वाढले असून ऊस, डाळिंब, बोर, केळी, पपई, शेवगासह जिरायती पिकांस मोठा फायदा होणार आहे. तलाव परिसरात अजून म्हणावा असा मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत होता. पण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी सुखावला आहे.

हेही वाचा: 'आबासाहेबांनी डोंगराएवढी कामे केली, निवडणूक स्वबळावर लढवू!'

सोनके-तिसंगी तलावात पाणी सोडण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागत होती. पण अधिकारी वर्गाच्या योग्य नियोजनमुळे तलाव वेळेत भरला. यामुळे परिसरातील ऊस शेतीला मोठा फायदा होणार आहे.

- पांडुरंग हाके, युवा शेतकरी, सोनके, ता. पंढरपूर

तलाव पूर्ण क्षमेतेने भरला आहे. पण तलावाखालील वितरिका दुरुस्ती करणे गरजेचे आहे. वेळोवेळी अस्तरीकरण करण्याची मागणी केली आहे. अधिकारी वर्गाने भविष्यात पाण्याचे योग्य नियोजन करावे.

- शोभा वाघमोडे, सदस्या, जिल्हा परिषद

सोनके-तिसंगी तलाव हा पंढरपूर तालुक्‍यातील नयनरम्य परिसर आहे. तलाव परिसरात पर्यटनस्थळ धर्तीवर शासनाने विकास करावा. निसर्गप्रेमींना पाहण्यासारखे ठिकाण आहे.

- सारिका चंदनशिवे, सरपंच, सोनके, ता. पंढरपूर

सोनके-तिसंगी तलाव हा परिसरातील गावांना वरदान ठरलेला आहे. चार हजार हेक्‍टर क्षेत्र तलावावर अवलंबून आहे. पुढील काळात अधिकारी वर्गाने योग्य नियोजन करावे.

- भारत कोळेकर, संचालक, सहकार शिरोमणी कारखाना

loading image
go to top