esakal | मृत्यूदरात "दक्षिण' पहिल्या तर अक्‍कलकोट दुसऱ्या क्रमांकावर ! उपचाराच्या विलंबामुळेच वाढले मृत्यू

बोलून बातमी शोधा

Mortality
मृत्यूदरात "दक्षिण' पहिल्या तर अक्‍कलकोट दुसऱ्या क्रमांकावर ! उपचाराच्या विलंबामुळेच वाढले मृत्यू
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहराचा मृत्यूदर 4.21 टक्‍क्‍यांवर आला असून वास्तविक पाहता तो तीन टक्‍क्‍यांपर्यंतच असणे अपेक्षित आहे. ग्रामीण व शहरी अशी मृत्यूदरात स्पर्धाच सुरू झाल्याचे चित्र असून 11 तालुक्‍यांपैकी दक्षिण सोलापूरचा सर्वाधिक 6.04 टक्‍के मृत्यूदर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अक्‍कलकोट असून या तालुक्‍याचा मृत्यूदर 4.04 टक्‍के इतका आहे. मंगळवेढ्याचा मृत्यूदर दोन टक्‍के असून अन्य तालुक्‍यांत मृत्यूचे प्रमाण कमी- अधिक आहे. परंतु, रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूदर त्या ठिकाणी कमी असल्याची स्थिती आहे.

शहरातील कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी 50 खासगी व सरकारी रुग्णालयांनी सेवा सुरू केली आहे. मात्र, ऑक्‍सिजनचा तुटवडा, वेळेत उपचार न मिळणे आणि बेडची कमतरता भासू लागल्याने अनेकांना जीव गमवावा लागत असल्याची स्थिती समोर येऊ लागली आहे. दुसरीकडे, हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिक, को- मॉर्बिड रुग्णांबरोबरच तरुणांचाही समावेश आहे. त्यातील रुग्णांना ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरची गरज भासू लागली असून रिकामा झालेला बेड तरुण रुग्णाला की को- मॉर्बिड अथवा ज्येष्ठ रुग्णाला द्यायचा, असा पेच काही रुग्णालयांसमोर निर्माण होऊ लागला आहे. रुग्णांना वाचविण्यासाठी सर्वांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु सौम्य लक्षणे असतानाही नव्हे तर तीव्र लक्षणे जाणवू लागल्यानंतर रुग्ण दवाखान्यात येत आहेत. त्यामुळे मृत्यूदर वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, लक्षणे असल्यास तत्काळ दवाखान्यातून उपचार घ्यावेत, कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

हेही वाचा: 59 वर्षांची झेडपी ! पदाधिकाऱ्यांकडून "आरोग्या'पेक्षा बांधकाम अन्‌ रस्त्याच्या कामांना प्राधान्य

मृत्यू व संसर्गाची कारणे...

  • त्रास होत असतानाही आजार अंगावर काढण्याचे वाढले प्रमाण

  • लक्षणे असतानाही टेस्टसाठी संशयितांकडून नकार

  • पॉझिटिव्ह व्यक्‍तींकडून संपर्कातील व्यक्‍तींची लपविली जातेय माहिती

  • मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे लोकांना नाही गांभीर्य

  • रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास रुग्ण करू लागलेत विलंब

  • पूर्वीचा विषाणू को- मॉर्बिड रुग्णांसाठीच घातक होता; आता विषाणूचा संसर्ग वाढला असून लहान मुलांपासून सर्वांनाच होतोय संसर्ग

हेही वाचा: कोव्हिड केअर सेंटरमध्येच अपुरे मनुष्यबळ ! तीन डॉक्‍टरांवर "सिंहगड'ची जबाबदारी

उपचारासाठी विलंब केल्याने मृत्यूचे प्रमाण वाढू लागले

कोरोनाचा हा विषाणू जास्त ऍग्रेसिव्ह असून त्याचे अंग बदलले आहे. पहिल्या लाटेत को- मॉर्बिड व ज्येष्ठांमध्ये संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र, आता लहान मुलांपासून सर्वांनाच त्याची बाधा होऊ लागली आहे. लक्षणे असतानाही आजार अंगावर काढल्याने आणि उपचारासाठी विलंब केल्याने मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे.

- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्याधिकारी, सोलापूर