
सोलापूर : गाळप केलेल्या उसाची एफआरपीच्या 14 टक्के रकमेसह ऊसदर जाहीर करावा, या मागणीसाठी दामाजी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन अज्ञात दोन इसमांनी तलवारीची भीती दाखवत मोडून काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दाखल करण्यात आली.
याबाबतची फिर्याद दत्तात्रय लक्ष्मण पाटील (रा. मरवडे) यांनी दिली असून, फिर्यादीत म्हटले आहे, की गाळप केलेल्या उसाची तोडणी केल्यापासून 14 दिवसांच्या आत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक आहे. असे असताना दामाजी साखर कारखान्याने या नियमाचे पालन केले नाही म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राहुल घुले, श्रीमंत केदार व राजेंद्र रणे यांच्यासह दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले आहे.
हे आंदोलन सुरू असताना काल (शुक्रवारी) रात्री 10.30 वाजता मुख्य चौकापासून लाल रंगाच्या डिस्कवर गाडीवरून 35 ते 40 वयोगटातील अज्ञात दोघे आले. मागे बसलेल्या इसमाने भगवा शर्ट घातलेला होता. त्यांच्या हातात तलवारी होत्या. त्या तलवारीचा धाक दाखवून समोरून जात धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यांचा चेहरा व्यवस्थित ओळखता आला नाही. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले दोन होमगार्ड त्यांचा पाठलाग केला असता ते मिळून आले नाहीत.
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मरवडे येथे ट्रॉली जाळण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता, तसाच प्रकार शेतकऱ्यांकडून बालाजीनगर येथेही झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक घेत त्या बैठकीत 15 तारखेपर्यंत याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.