
सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा सुरू केली जाणार आहे. सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांमध्ये तशी सोय करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात अधिकारी व फिर्यादी, पोलिस व आरोपी यांच्यातील संवाद व घटनांची वस्तुस्थिती वरिष्ठांना पडताळता येणार आहे. या नवतंत्रज्ञानामुळे लाच घेण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास सर्वसामान्यांना आहे.
पोलिस ठाण्यात फिर्याद द्यायला आल्यानंतर पोलिसांनी पैसे मागितले, अरेरावीची भाषा वापरली, व्यवस्थित वागणूक दिली नाही, पोलिसांनी मारहाण केली, पोलिसांनी फिर्याद घेतलीच नाही किंवा आम्ही म्हणतोय तशी फिर्याद घेतली नाही, असे आरोप अनेकदा केले जातात. त्याची चौकशी करताना काहीच पुरावे नसल्याने ते आरोप खरे असले तरीही वस्तुस्थिती समोर येत नाही. काहीवेळा खोट्या आरोपांमुळे पोलिस खात्याला बदनामीही सहन करावी लागते. अनेकदा पोलिस आणि फिर्यादीत वादावादी होते. यावर उपाय म्हणून आता शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यातच आता ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा असणार आहे. त्यामुळे लाच घेणे किंवा पैशांची मागणी करण्याचे प्रकार थांबतील, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पोलिस ठाण्यातील मारहाणीमुळेच आरोपीचा मृत्यू झाल्याचे प्रकार व आरोपदेखील केले जातात. या नवतंत्रज्ञानामुळे तसे प्रकार होणार नाहीत.
पोलिस चौक्या बंदच राहतील
सोलापूर शहरात एकूण सात पोलिस ठाणी आहेत. पोलिस ठाण्यांवरील ताण कमी व्हावा, नागरिकांची (फिर्यादी) सोय व्हावी या हेतूने शहरात ३५ पोलिस चौक्या उभारण्यात आल्या. पण, तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सर्व चौक्या बंद करून पोलिस ठाण्यातूनच फिर्यादी दाखल होतील, असे आदेश दिले होते. तेव्हापासून पोलिस चौक्यांचे कामकाज बंद आहे. ज्यावेळी पोलिस चौक्या सुरू करण्याची गरज वाटेल, तेव्हाच त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.
शहरातील सात पोलिस ठाण्यांमध्ये एका खासगी एजन्सीमार्फत प्रत्येकी एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला जाणार आहे. त्यातच पोलिस ठाण्याअंतर्गत हालचाली व आवाज रेकॉर्डिंग होईल. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाची वस्तुस्थिती समजण्यास मदत होणार आहे.
- राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर