
Solapur News : रस्त्याच्या कामासाठी येवती ग्रामस्थांचे उपोषण
मोहोळ : पेनुर ते रोपळे या रस्त्याचे डांबरीकरण करावे या मागणीसाठी येवती ता मोहोळ येथील ग्रामस्थांनी मोहोळ तहसील कार्यालया समोर शुक्रवार ता 23 पासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, रोपळे ते पेनुर हा 13 किलोमीटरचा रस्ता असून, हा रस्ता रहदारीचा आहे.
या रस्त्यावरून दूध, भाजीपाला, शाळकरी विद्यार्थी यांची मोठी वर्दळ सुरू आहे. याच रस्त्यावरून आष्टी शुगर, लोकनेते, भीमा, जकराया, आधीसह पंढरपूर तालुक्यातील साखर कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू आहे. या रस्त्याच्या कडेला पेनुर, येवती, रोपळे ही बागायती गावे आहेत. हा रस्ता कुर्डूवाडी ते पंढरपूर या पालखी मार्गाला रोपळे येथे जोडणारा रस्ता आहे,त्यामुळे व्यापारी, वारकरी, शेतकरी या सर्वांना हा रस्ता सोयीस्कर आहे.
या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनास वेळोवेळी अर्ज विनंती करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. तातडीने या रस्त्याचे काम सुरू करावे यासाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणात महेश खुर्द, मोहन कुंभार, शरद गोडसे, देवानंद खुर्द, भागवत खुर्द, संभाजी दिघे, नंदकुमार खुर्द, जावेद मुलाणी, समाधान रणदिवे, बालाजी खुर्द, अरुण गोडसे, नवनाथ गोडसे, राजाराम पाटील, संतोष शितोळे आधीसह बहुसंख्य ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला आहे.