esakal | सात तालुक्‍यांमधील चिमुकली पुस्तकाविनाच ! साडेतेरा लाख पुस्तके तालुका स्तरावर पडून
sakal

बोलून बातमी शोधा

BALBHARTI

जूनपासून आजपर्यंत सात तालुक्‍यांमधील एकाही मुलाला पुस्तक मिळाले नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

सात तालुक्‍यांमधील चिमुकली पुस्तकाविनाच ! साडेतेरा लाख पुस्तके पडून

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग पूर्णपणे बंद आहेत. त्या मुलांना ऑनलाइन शिक्षण (Online Education) दिले जात आहे, परंतु ग्रामीण भागातील बहुतेक मुले ऑनलाइन शिक्षणापासून दूर आहेत. त्यांना पुस्तकांचा (Text Books) आधार घेऊन पालकांच्या माध्यमातून शिक्षण घेता यावे म्हणून बालभारतीकडून (Balbharati) तत्काळ पुस्तके मिळणे अपेक्षित होते. मात्र, जूनपासून आजपर्यंत सात तालुक्‍यांमधील एकाही मुलाला पुस्तक मिळाले नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

हेही वाचा: शाळा सुरू करण्याचा 'या' दिवशी निर्णय! मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

शाळा बंद असल्याने मुलांमधील शिक्षणाची गोडी कमी झाली असून, अनेकजण शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. सेतू अभ्यासक्रम, स्वाध्यायमालाच्या माध्यमातून मुलांपर्यंत शिक्षण पोचविण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला. परंतु, कोरोनामुळे हे उपक्रम ऑनलाइन राबवावे लागले. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांधील जवळपास पाच लाख विद्यार्थ्यांकडे ऍन्ड्रॉइड मोबाईल नाहीत. अशा मुलांना गृहभेटी, पारावरची शाळा, यातून शिक्षणाचे धडे दिले जात होते. परंतु, कोरोना रुग्णांची ग्रामीणमध्ये वाढलेली संख्या आणि तिसऱ्या लाटेची भीती, यामुळे हे उपक्रम बंद करावे लागले. या पार्श्‍वभूमीवर शिक्षणापासून दूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांच्या माध्यमातून शिक्षण देण्याची नितांत गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्‍त केले. मात्र, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माळशिरस व माढा तालुक्‍यांशिवाय उर्वरित सात तालुक्‍यांमधील एकाही मुलाला बालभारतीकडून पुस्तके मिळालेली नाहीत.

हेही वाचा: 16 सप्टेंबरपासून सुरू होतील शहर-जिल्ह्यातील महाविद्यालये!

'बालभारती'कडेच 85 हजार पुस्तके

बालभारतीकडून सोलापूर जिल्ह्यासाठी 22 लाख 32 हजार 886 पुस्तके येणे अपेक्षित आहे. त्यापैकी 21 लाख 48 हजार 187 पुस्तके तालुका स्तरावर येऊन पडली आहेत. मात्र, उत्तर सोलापूर (2,10,444), दक्षिण सोलापूर (1,80,786), माढा तालुक्‍यासाठी (1,90,137) आणि माळशिरस तालुक्‍यातील विद्यार्थ्यांसाठी दोन लाख 88 हजार 788 पुस्तके वितरीत केली जात आहेत. उर्वरित सात तालुक्‍यांमधील विद्यार्थ्यांची 13 लाख 62 हजार 632 पुस्तके तालुकास्तरावरच वाटपाविना पडून आहेत. दुसरीकडे, बालभारतीकडून अजूनही 84 हजार 699 पुस्तके आलेली नाहीत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.

बालभारतीकडून पुस्तके वितरणासाठी मे. शिरीष कार्गो प्रायव्हेट लि. या वाहतुकदाराची नियुक्‍ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्‍यातील केंद्रांवरील शाळांपर्यंत पुस्तके पोच केली जाणार आहेत. आठ दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील, अशी अपेक्षा आहे.

- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

loading image
go to top