शेजबाभूळगावच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाउनमध्ये पिकविला देशी भाजीपाला ! "ग्यान' व "आयआयएम'ने घेतली दखल 

Deshi Vegitable
Deshi Vegitable
Updated on

वाळूज (सोलापूर) : लॉकडाउन काळात शेजबाभूळगाव (ता. मोहोळ) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशी फळभाजी व भाजीपाला पिकविला असून, या उपक्रमाची दखल गुजरातच्या "ग्यान' (Gujarat Grassroots Innovation Augmentation Network) आणि हैदराबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थानी घेतली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे. 

"सकाळ'शी बोलताना मुख्याध्यापक पैगंबर तांबोळी यांनी सांगितले, की शाळांमधील विद्यार्थ्यांचे चांगले पोषण व्हावे व संकरित बियाणांच्या जमान्यात भारतातील पारंपरिक देशी बियाणे टिकावेत, त्यांचा प्रसार व्हावा यासाठी गुजरातमधील अहमदाबादची ग्यान संस्था व गोदरेज ऍग्रोटेक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी देशभरातील 248 शाळांना 12 प्रकारच्या भाजीपाला बिया जुलै महिन्यात पोस्टाने पाठविल्या होत्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील 44 शाळांचा समावेश होता. सर फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शाळा निवडण्यात आल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील 23 शाळांना या बिया मिळाल्या. शाळेच्या परसबागेत किंवा जागा उपलब्ध नसल्यास शिक्षक, विद्यार्थी यांच्या शेतात शाळांनी बिया रुजविल्या. चवळी, भोपळा, दोडका, घोसावळे, घेवडा, तूर, वांगी, टोमॅटो, भेंडी, वाल या बिया शाळांना देण्यात आल्या आहेत. 

अंकोली येथील इनोव्हेटिव्ह स्कूलने लॉकडाउनच्या काळात शाळेत बियांची लागवड केली. विज्ञान ग्रामच्या सहकार्याने तयार केलेल्या शाळेतील डोमवरील (घुमटाकार वर्गखोली) गवताचे छत काढून सभोवताली भोपळा, घेवडा, घोसावळे, दोडका यांच्या वेलींची लागवड केली. या वेली डोमवर चढविल्याने हिवाळ्यात व उन्हाळ्यात वेगळ्या छताची गरज राहिली नाही. वेलींच्या आच्छादनामुळे तयार झालेल्या हिरव्यागार छताखाली बसून ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असणारी काही मुले अध्ययन करतात. या वेलींची देखभालही करतात. अन्य भाजीपाला शाळेसमोर लावण्यात आला आहे. प्रामुख्याने घेवडा, तूर, वांगी यावर पडणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी या किडींच्या प्रादुर्भावापासून रक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर न करता केवळ दोनशे रुपये खर्चातून जुन्या तेलाच्या डब्याला पिवळा ऑइलपेंट लावून आत छोटी ट्यूब बसविली आहे. संध्याकाळी ही ट्यूब दीड तास लावल्याने हे सर्व कीटक त्याकडे आकर्षित होऊन नष्ट होतात. 

संध्याकाळ होण्यापूर्वी डोममध्ये ट्यूब लावल्याने भाजीपाल्यांच्या वेलींना अजून सूर्यप्रकाश मिळत असल्याचे वाटते व त्यांचे प्रकाश संश्‍लेषणाचे काम रात्र होऊनही काही काळ सुरू राहते. त्यामुळे उत्पादनातही वाढ होते. डॉ. आनंद कर्वे यांचे हे संशोधन शाळेत वापरून मुलांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न होत आहे. 

इनोव्हेटिव्ह स्कूलचे मुख्याध्यापक रियाज तांबोळी व विद्यार्थी अलिना तांबोळी, श्रावणी शिंदे, मोहम्मद तांबोळी, समर्थ भालेराव, कृष्णा भालेराव यांच्यासह शेजबाभूळगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी पृथ्वीराज लाळे, हर्षवधन इंगळे, शिवम भालेराव हे संशोधनात सहभागी आहेत. आयआयएम अहमदाबादचे पद्मश्री अनिल गुप्ता, अरुण देशपांडे, चेतन पटेल, संकेत सावलिया, सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे, पैगंबर तांबोळी, अजिज तांबोळी यांचे यासाठी मार्गदर्शन मिळत आहे. 

संबंधित संस्थांनी शाळेने केलेल्या या प्रयोगांचे व्हिडिओ मागितले आहेत. देशभरातील शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून हे व्हिडिओ ते सोशल मीडियातून देशभर पोचवले जाणार आहेत. 
- पैगंबर तांबोळी, 
मुख्याध्यापक, शेजबाभूळगाव, ता. मोहोळ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com