मामा म्हणाले होते, "स्पर्धा परीक्षेसाठी लई हुशारी लागतीय, तुझ्याच्याने होणार नाही !' मात्र जिद्दीच्या जोरावर श्रीकांतने मिळवली मोठी पोस्ट

Shrikant Disle
Shrikant Disle

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : वडील सैन्यात असल्याने आपल्या मुलाने देखील सैन्यात अधिकारी होऊन देशाची सेवा करावी, आपल्यासारखी मुलाच्या अंगावरही देशसेवेची वर्दी असावी, असे वडिलांचे स्वप्न... परंतु मुलाला बारावीत चांगले मार्क असतानादेखील तो एनडीएच्या परीक्षेत नापास झाल्याने वडिलांच्या आशा मावळल्या. अपयशानंतर मुलाने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु मामा म्हणाले होते, "त्याला लई हुशारी लागतीय, तुझ्याच्याने हे होणार नाही!' पण तो मुलगा आज जिद्द व चिकाटीच्या जोरावर आहे पोलिस उपअधीक्षक. बार्शी तालुक्‍यातील जवळगावचे श्रीकांत डिसले यांची ही कहाणी... 

पहिल्यांदा गेले अपयशास सामोरे 
श्रीकांत डिसले यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण बार्शी येथे झाले. वडील सैन्यात असल्याने आपल्या मुलाने देखील सैन्यात अधिकारी होऊन देशाची सेवा करावी, अशी वडिलांची प्रबळ व दांडगी इच्छा होती. त्यादृष्टीने श्रीकांत यांना माध्यमिक शिक्षणासाठी बार्शी येथे शिकण्यास पाठवले. श्रीकांत हे लहानपणापासूनच हुशार व चलाख होते. एखादा निर्णय घेतल्यास तो पूर्ण होईपर्यंत मागे हटत नसत. त्यामुळे माध्यमिक शिक्षण त्यांनी चांगल्या रीतीने पूर्ण करत दहावीत चांगले मार्क मिळवले होते. वडिलांची इच्छा तर होतीच की, मुलाच्या अंगावर खाकी वर्दी असावी, तसे श्रीकांत यांना देखील खाकी वर्दीचे जाम आकर्षण होते. त्यामुळे सैन्यात अधिकारी होण्याच्या दृष्टीने त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. दोन वर्षे अथक परिश्रम घेत अभ्यास केला. त्यामुळे बारावी सायन्समध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण देखील झाले. कष्ट व प्रयत्न केल्यास फक्त यशच मिळते, असे माहीत असलेल्या श्रीकांत यांना जीवनात पहिल्यांदा अपयशास सामोरे जावे लागले; ते म्हणजे एनडीएच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले तेव्हा. 

आपण काहीही करू शकतो फक्त जिद्द पाहिजे हे उमजले 
बारावीपर्यंतच्या या स्पर्धात्मक युगात यश अन्‌ फक्त यश माहीत असलेल्या श्रीकांत यांना अपयशाची पहिली पायरी पाहावी लागली. वडिलांचे स्वप्न व खाकी वर्दीचे श्रीकांत यांचे स्वप्न अपूर्ण राहते की काय, अशी स्थिती निर्माण झालेली असताना, या काळात त्यांचा संपर्क स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवकांशी आला. तसेच पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या पोलिस खात्यातील कार्याच्या धडाकेबाज बातम्या दररोज वाचण्यात येऊ लागल्या. त्यांच्या कामगिरीचा ठसा श्रीकांत यांच्या मनात खोलवर रुजू लागला. दरम्यानच्या काळात श्रीकांत यांच्या आईचे आतेभाऊ राजकुमार शिंदे हे डीवायएसपी झाले. यामुळे श्रीकांत यांचा आत्मविश्वास आणखीन वाढला. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयासाठी श्रीकांत यांना आईवडील व मामाची परवानगी घ्यावी लागणार होती. तर दुसरीकडे पदवीचे शिक्षणही पूर्ण करायचे होते. एनडीएच्या परीक्षेत अपयश आल्याने श्रीकांत हे मनातून थोडे खचले होते. पण आत्मविश्वास व त्यांचा स्वतःवर पूर्णपणे विश्वास होता. आपण काहीही करू शकतो फक्त जिद्द, चिकाटी, प्रामाणिक व कष्ट पाहिजे हे त्यांना चांगले उमजले होते. 

अंगी असलेल्या वक्तृत्व कलागुणांना मिळाला वाव 
पुढील शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी पुण्याहून ते गावाकडे आले. त्या वेळी त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत बरेचसे निर्णय त्यांचे मामा घेत असत. स्पर्धा परीक्षा देण्याचा मानस आहे, अशी इच्छा त्यांनी घरी बोलून दाखवली. त्या वेळी त्यांचे मामा म्हणाले, "त्याला लय हुशार लागतं, ग्रामीण भागातील मुलांना सहजासहजी हे शक्‍य होत नाही. तुझ्याच्याने तर हे होणारच नाही. तू आपलं डीएएड कर व कुठेतरी नोकरीला लाग.' मामाच्या बोलण्याने खच्चीकरण झाल्यासारखे वाटत होते. परंतु ते जिद्दी असल्याने व खाकी वर्दीचे लागलेले आकर्षण त्यामुळे काही झाले तरी स्पर्धा परीक्षा करण्याच्या निर्णयावर ते ठाम होते. यावरून त्यांच्या चुलत भावाने एक पर्याय सुचवला. पदवीच्या शिक्षणासाठी वैराग येथे मुक्त विद्यापीठातून बीएसाठी प्रवेश घेतला. डीएएड व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले. तेथे त्यांची सैनिकांच्या मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात राहण्याची सोय करण्यात आली. येथे त्यांनी शिस्तबद्ध रीतीने जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम घेत अभ्यास सुरू केला. इथे त्यांच्या अंगी असलेल्या वक्तृत्व कलागुणांना वाव मिळाला. त्याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व गोष्टी येथे शिकायला मिळाल्या. 

वयाच्या 21व्या वर्षी स्पर्धा परीक्षेतील पदांना गवसणी 
परंतु हे सर्व करत असताना त्यांनी आपले अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यात येथे जर अपयश आले तर मामाचे ते शब्द सतत त्यांच्या डोक्‍यात घोळायचे. त्यामुळे ते ध्येयापासून कधीही दूर झाले नाहीत. पदवीचे शिक्षण पूर्ण होताच त्यांना मुंबई येथे बॅंकेत चांगल्या हुद्द्यावर नोकरी लागली. तर इकडे मामाच्या म्हणण्यानुसार डीएएडचे शिक्षणही पूर्ण झाले होते. बॅंकेची नोकरी स्वीकारून ते मुंबई येथे गेले. परंतु मनात अजूनदेखील खाकी वर्दीचे आकर्षण कायम होते. त्यामुळे नोकरीच्या निमित्ताने लोकलमधून प्रवास करत असताना देखील पुस्तके, नोट्‌स वाचणे, घरी आल्यानंतर अधिकाधिक वेळ अभ्यासासाठी देणे हे त्यांचे ठरलेले होते. तसेच पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एमपीएससीने घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेत त्यांनी पहिल्या प्रयत्नात मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर त्यांची विक्रीकर निरीक्षकपदी नियुक्ती झाली होती. "यहा हारना मना है', केले तर काहीच अशक्‍य नाही, हे त्यांना चांगलेच समजले होते. त्यांनी अल्पावधीच्या काळातच म्हणजे वयाच्या 21व्या वर्षापासून स्पर्धा परीक्षेतील या पदांना गवसणी घातली होती. परंतु त्यांचे ध्येय अद्याप पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा त्याच जोमाने अभ्यास सुरू केला. 

अन्‌ खाकीचे स्वप्न पूर्ण झाले 
पुढे त्यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून ते उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत होते. तरीदेखील स्वप्न अद्याप पूर्ण झाले नाही. म्हणून ते थोडेसे नाखूश होते. मित्रांनी या नाराजीबद्दल विचारले असता श्रीकांत यांनी सांगितले, "मी ज्या पदासाठी झटतोय ते अद्याप मला मिळाले नाही. ते जेव्हा मिळेल तेव्हा खरे माझे स्वप्न पूर्ण होईल.' मित्रांनी सांगितले, "तुला आता अतिआत्मविश्वास निर्माण होऊ लागला आहे, बस कर. आता वर्ग एकचे पद मिळालेले आहे. तुला आता होत नाही.' परंतु श्रीकांत यांनी मित्रांना सांगितले होते, "असंच पुढच्या वर्षी डीवायएसपी झाल्यानंतर भेटायला या.' कारण त्यांना त्यांच्या अभ्यासावर व स्वतःवर ठाम आत्मविश्वास होता, की आपण हे करू शकतो. अखेर 2014 च्या परीक्षेत त्यांना अपेक्षित असलेले खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली. 

मित्रांमध्ये त्यांची त्या वेळी वेगळी ओळख निर्माण झाली. "अधिकारी होणारे बरेच आहेत, पण दरवर्षी मी हे पद मिळवणार' असं सांगणारा हा बार्शीचा एकमेव पट्ट्या आहे, असे त्यांचे मित्र आजही बोलतात. आत्मविश्वास, विविध कलागुण, व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध सर्वांगीण कला त्यांच्या अंगात असल्याने सहजासहजी त्यांनी एकापाठोपाठ एक यश संपादन केले. 

सलग चार वर्षांत मिळवली चार पदे 
वयाच्या एकविसाव्या वर्षी पोलिस उपनिरीक्षक, बाविसाव्या वर्षी विक्रीकर निरीक्षक, तेविसाव्या वर्षी उपमुख्य कार्यकारी अधिकारी व चोविसाव्या वर्षी पोलिस उपअधीक्षक पदी निवड झालेले श्रीकांत डिसले हे त्यांच्या गावच्या परिसरातील एकमेव पहिले अधिकारी आहेत. त्यांच्या यशात आई, वडील, मामा, चुलत भाऊ व मित्र परिवाराचे मोठे सहकार्य आहे. विश्वास नांगरे-पाटील यांचा आदर्श श्रीकांत डिसले यांच्यासमोर कायम होता व आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com