परिस्थितीशी दोन हात करत बार्शी तालुक्‍यातील दोन सुपुत्रांनी घातली शिक्षण उपसंचालकपदाला गवसणी ! 

Ukirde_Kshirsagar
Ukirde_Kshirsagar

पांगरी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील टोणेवाडी व आगळगाव येथील सुपुत्र सध्या शिक्षणाधिकारी म्हणून सातारा व लातूर येथे कार्यरत असून, त्यांना पुणे विभाग शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. टोणेवाडी येथील राजेश गोपीनाथ क्षीरसागर हे सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची पुणे येथे शिक्षण उपसंचालक अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे तर आगळगाव येथील औदुंबर संपतराव उकिरडे हे लातूरचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते; त्यांची शिक्षण उपसंचालक, पुणे येथे पदोन्नती झाली आहे. 

टोणेवाडी या 400 लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावातील राजेश क्षीरसागर यांचे शालेय शिक्षण एम.ए. एम.एड. सेट, वृत्तपत्र विद्या पदवीपर्यंत झाले आहे. माळीनगर येथे माध्यमिक शिक्षक म्हणून 17 वर्षे सेवा केली. हे करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तत्सम पदे, प्रशासन शाखा गट अ पदी 2013 मध्ये निवड झाली. रत्नागिरी येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून सेवा होऊन सध्या सातारा येथे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांना पुणे येथे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. 

कोरोनापूर्वीच ऑनलाइन कामकाजाचा धरला आग्रह 
माळीनगर येथे मांडले विविधांगी प्रशालेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थी घडविले. एका दैनिकात वार्ताहर म्हणून 12 वर्षे काम केले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत सहाय्यक आयुक्त असताना तीन वर्षांच्या कालवधीत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती या विभागाची जबाबदारी यशस्वीपणे संभाळत असताना कामकाज ऑनलाइन व आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने मागविण्याचा प्रयत्न केला. राज्यस्तरावर टंकलेखन परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होण्यासाठी पुढाकार घेतला. रत्नागिरी येथे "शिक्षणाची वारी'च्या सहसंयोजनाची जबाबदारी पार पाडली. राज्य शिक्षक पुरस्कार सोहळा संयोजनाची जबाबदारी घेऊन हा सोहळा प्रथमच सातारा येथे होऊन ऐतिहासिक ठरला. दहावीची कल चाचणी मोबाईल ऍपद्वारे प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्यात राबविण्यात आली. कोरोना येण्यापूर्वीच ऑनलाइन कामकाजासाठी आग्रह व पुढाकार घेतला. या कालवधीत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवून ते प्रभावी ठरले. वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा भरती होण्यासाठी जिल्हास्तरावर प्रतीक्षा यादी बनविली. 

राजेश क्षीरसागर यांचे प्राथमिक शिक्षण टोणेवाडी, गोरमाळे येथे झाले तर माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल, उस्मानाबाद येथे झाले. त्यानंतर बार्शी येथे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात डीएड केले. पुढे शिकण्याची इच्छा होती, पण परिस्थिती नाजूक असल्याने शिक्षण थांबवून नोकरी शोधण्यास सुरवात केली. सहा महिन्यांतच माळशिरस तालुक्‍यातील नीरा नदीच्या काठी वसलेल्या माळीनगर येथील मॉडेल विविधांगी प्रशाला येथे सहशिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली आणि तेथूनच आयुष्याला नवे वळण मिळाले. 

कुटुंबात ते सर्वांत धाकटे. मोठा भाऊ नानाजी यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण चालू होते. कुटुंबाची सर्व जबाबदारी राजेश यांच्यावर आली होती. चालू नोकरी आवश्‍यक होती. 
बहिस्थ शिक्षण घेत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून 1998 ला इतिहास विषयातून द्वितीय श्रेणीत बीए पदवी तर 2001 मध्ये याच विद्यापीठातून एमएची पदवी मिळवली. 2004 मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 2005 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून वृतपत्र विद्या पदवी (बीजे) सोलापूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून संपादन केली. पुढे नाशिक मुक्त विद्यापीठातून सोलापूर येथील कस्तुरबाई बीएड कॉलेज या अभ्यास केंद्रातून एमएड ही पदव्युत्तर पदवी 2008 मध्ये प्रथम श्रेणीत प्राप्त केली. 2009 मध्ये शिक्षणशास्त्र विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे पीएचडी करण्याची इच्छा होती, पण ध्येय गाठण्यासाठी शिक्षण थांबवावे लागले. 

बीए पदवी घेतल्यापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध पदांच्या स्पर्धा परीक्षा देण्यास सुरवात केली. पी. एस. आय. एस. टी. आय. परीक्षा दिल्या. मुख्य परीक्षा देऊनही अनेकवेळा अपयश आले. अपयशाने खचून न जाता अभ्यास चालूच ठेवला. अशातच एकदा यूपीएससीमध्ये यश मिळविलेल्या डॉ. पाटील (सांगली) यांचे स्फूर्ती देणारे पत्र आले. या पत्रातील मजकुराने नवी ऊर्जा मिळाली. एमपीएससी, यूपीएससी परीक्षेबरोबर शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी चालू केली. शाळेत नोकरी करीत असताना गणित, शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी मुलांकडून घेत असत. बीएड, एमएड झाल्याचा चांगला फायदा झाला. शाळेत माध्यमिक शिष्यवृती परीक्षांसाठी सात वर्षे मुलांना मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. 2008 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपशिक्षणाधिकारी वर्ग दोन पदाची परीक्षा दिली व उत्तीर्णही झाले. पण मुलाखतीला अपयश आले. त्यामुळे ते खूप निराश झाले. काय करावे काही सुचत नव्हते. त्यातच 2009 मध्ये वडिलांचे निधन झाले. अथांग सागरात दिशाहीन झालेल्या बोटीसारखी त्यांची अवस्था झाली होती. या काळात दक्षिण मुंबईच्या तत्कालीन शिक्षण निरीक्षक सुमन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले व पुन्हा 2010 मध्ये शिक्षणाधिकारी वर्ग एकची परीक्षा दिली. लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन 14 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबई येथे लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात मुलाखत दिली. त्यात ते यशस्वी झाले. 

औदुंबर उकिरडे यांचा शिक्षक ते शिक्षण उपसंचालक प्रवास 
आगळगाव (ता. बार्शी) येथील सुपुत्र व सध्या लातूर येथे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले औदुंबर उकिरडे यांची पुणे विभाग शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती झाल्याने आगळगावामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बार्शी तालुक्‍यातील आगळगाव हे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. बहुतेक सर्व घरांत एक-दोन व काही काही घरांत अठरा शिक्षक असलेले गाव. औदुंबर उकिरडे यांचा शिक्षक ते शिक्षण उपसंचालक प्रवासदेखील थक्क करणारा आहे. 

औदुंबर उकिरडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आगळगाव, माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, काटेगाव आणि उच्च माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथे झाले. पहिलीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. चौथी व सातवी शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान त्यांनी मिळवला. दहावीला 89 टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला. नंतर बारावीत शास्त्र शाखेत 78 टक्के व ग्रुपिंगला 89 टक्के गुण मिळवले. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची त्यांची इच्छा थोड्या गुणांनी हुकली. नंतर बीए एमएस, बीएस्सी, बीएस्सी ऍग्री की डीएड्‌ या संघर्षात दोन वर्षांचा डीएड्‌ अभ्यासक्रम शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय येथे पूर्ण केला. नंतर श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात बीए पदवी इंग्रजी विषयात पूर्ण केली. बीएला शिवाजी विद्यापीठात द्वितीय क्रमांकासह सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथून इंग्रजी विषयात बी प्लसने पदव्युत्तर पदवी मिळवली. 

औदुंबर उकिरडे यांची रायगड जिल्हा परिषदेत वडगाव गावी प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी लागली. अध्यापन करीत असताना अध्ययन मात्र सोडले नाही. विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवत असताना स्वतःही सर्व विषयांचा अभ्यास केला. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे, याची जाणीव त्यांना झाली आणि या क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी याच क्षेत्रातील आपण अधिकारी झाले पाहिजे, अशी जाणीव त्यांना झाली आणि त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले. 

बार्शी तालुक्‍यातील उपळाई ठोंगे येथील जिल्हा परिषद शाळेत बदली झाली. तीन वर्षे या शाळेत नोकरी करीत असताना अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनवले. वृक्षारोपणासह अनेक उपक्रम राबविले व शाळेची गुणवत्ता वाढवली. याच दरम्यान दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मंत्रालय सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक, उपशिक्षणाधिकारी या पदांवर निवड झाली. हा सर्व अभ्यास करत असताना एक दिवसही रजा न घेता सकाळी व संध्याकाळी नियोजनपूर्वक अभ्यास करून यश मिळवले. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी सुवर्णा यांची खरी साथ त्यांना मिळत आहे. मुलगा उत्कर्ष, मुलगी श्रेया यांचा अभ्यास, कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे ही सर्व कामे त्या स्वतःची नोकरी सांभाळून अगदी मनापासून करतात. म्हणूनच औदुंबर यांनाही शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येते. 

विधिमंडळात गौरवपूर्ण उल्लेख 
2011 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतरही अभ्यास चालूच ठेवला व 2012 मध्ये एमपीएसी परीक्षेमार्फत शिक्षणाधिकारी (वर्ग 1) म्हणून त्यांची निवड झाली. याही परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. या सर्व परीक्षेत कोठेही क्‍लास न लावता घरीच अभ्यास करून उज्ज्वल यश मिळवले. भूम येथे गटशिक्षणाधिकारी, उस्मानाबाद येथे शिक्षणाधिकारी, लातूर येथे शिक्षणाधिकारी व लातूर बोर्डाचे विभागीय सचिव म्हणून कार्य करीत असताना नेहमीच आपल्या कार्याचा चांगला ठसा उमटवून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक, गुणवत्तापूर्ण काम उकिरडे यांनी केले आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांचा गौरवपूर्ण नामोल्लेख झाला आहे, ही निश्‍चितच अभिमानास्पद गोष्ट आहे. 

लातूर पॅटर्न पुन्हा उंचावला 
मार्च 2020 च्या एसएससी परीक्षेत 134 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवून राज्यात विक्रम करून लातूर पॅटर्नला पुन्हा एकदा उभारी दिली. असेच कार्य करीत असताना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार त्यांना पुणे विभागाचे उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com