
महूद (ता. सांगोला, जि. सोलापूर) : उन्हाळ्यात उसाचा ताजा व थंड रस पिण्याचा आनंदच वेगळा आहे. उन्हाळ्यात हा उसाचा रस पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते व डीहायड्रेशनपासून बचाव होतो. शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील रसवंतीगृहांची घुंगरे खळखळलीच नाहीत. याचा फटका शेतकरी, छोटे व्यावसायिक, मजुरांना बसलेला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देश लॉकडाउन आहे. या लॉकडाउनच्या झळा शहरापासून गावगाड्यापर्यंत सगळ्यांनाच बसलेल्या आहेत. यातून रसवंतीगृहसुद्धा सुटलेले नाही. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात शहरापासून ते गाव, वाडी-वस्तीवर रस्त्याच्या कडेला असणारी रसवंतीगृह सुरू झालीच नाही. त्यामुळे रस काढण्याच्या यंत्राला बांधलेली घुंगरे यावर्षी खळखळलीच नाहीत. गेल्यावर्षी घुंगरांचा बंद झालेला आवाज यावर्षी ऐकायलाच आला नाही. यामुळे मोठ्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली.
उन्हाळ्याची चाहूल लागली की, गावात रस्त्याच्या बाजूला रसवंतीगृहाच्या घुंगरांचा खुळखुळ आवाज घुमू लागतो. रस्त्यावरून ये-जा करणारे सर्वजण कुटुंबासह लिंबू व आले घातलेल्या उसाच्या रसाचा आस्वाद घेतात. ग्रामीण व शहरी भागासाठी हंगामी पण कमी भांडवलात करता येणारा आणि चांगले उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना प्रत्येक जण काहीतरी थंड पिण्यास पसंती देतो. त्यातच आरोग्यदायी उत्तम पेय म्हणून उसाच्या रसाला सर्वजणच पसंती देतात. पुणे-मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरापासून ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर रस्त्याच्या कडेला असणारी ही रसवंतीगृहे उन्हाळ्यात लाखो-करोडो लोकांची तहान भागवतात. इतर कोणत्याही शीतपेयापेक्षा उसाचा रस आरोग्यदायी असल्याने सर्वांची याला पसंती असते. फेब्रुवारी महिन्यापासून रसवंती व्यवसाय सुरू होतात. यानंतर मार्च, एप्रिल, मे आणि जूनमध्ये या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. रसवंती व्यवसायातून रसवंती मालक, काम करणारे मजूर, तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांना मोठा फायदा होतो.
कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्व काही बंद आहे. याचा फटका या व्यवसायालाही बसला असून या वर्षीचा हंगाम वाया गेल्याने सर्वसामान्य शेतकरी, मजूर, व्यावसायिक यांची आर्थिक घडी विस्कळित झाली आहे. चांगल्या उत्पादनाच्या आशेने अनेक शेतकरी शेतात रसवंतीसाठीचा ऊस लागवड करतात. कोविड-19 पासून दूर राहण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करणे टाळत असल्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतरही रसवंती व्यवसाय चालणार नाही, असे चित्र आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांनाही फटका
राज्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला शेतकरी स्वतः रसवंतीगृह चालवतात. त्यासाठी प्रामुख्याने 671 व 86032 हा उसाचा वाण वापरला जातो. हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांची मुले यात अधिक आहेत. उन्हाळ्यात मुलांना मिळणाऱ्या सुट्ट्या, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम यामुळे गावोगावी नागरिकांची मोठी रेलचेल असते. या वेळी खास करून उसाचा रस मागवला जातो. तर प्रवासात गर्द सावलीच्या ठिकाणी गाडी थांबून कुटुंबासह उसाचा रस पिण्याची मजा औरच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.