esakal | दरोड्यातील संशयित आरोपीचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न !
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

दरोड्यातील संशयित आरोपीचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न !

sakal_logo
By
प्रशांत काळे

वैराग येथील दरोडा, मोक्कातील संशयित आरोपींना शोधण्यासाठी बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे पथक कोरफळे येथे गेले असता एकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

बार्शी (सोलापूर) : वैराग येथील दरोडा, मोक्कातील संशयित आरोपींना शोधण्यासाठी बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे (Barshi Taluka Police Station) पथक कोरफळे येथे गेले असता एकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून, पोलिसांच्या तावडीतून एकजण फरार झाला आहे. एकास पोलिसांनी अटक केली आहे तर दोन महिलांसह तिघांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Suicide attempt of a suspect in a robbery at Korphale)

हेही वाचा: माता न तू वैरीणी ! अज्ञातांनी सोडून दिले बावी येथे नवजात अर्भक

कालिंदा राजकुमार काळे (रा . कोरफळे), आशाबाई पंप्या शिंदे (रा. लाडोळे) आनंद्या राजकुमार रामराया काळे (रा. कोरफळे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत . हवालदार रियाझ शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता घडली.

वरिष्ठांच्या आदेशानुसार वैराग येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी कोरफळे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस केसरे, देवकर, मेहेर व चव्हाण यांचे पथक तेथे गेले. घरासमोर आनंद्या काळे व राजकुमार रामराया काळे बसले होते. पोलिसांना पाहताच आनंद्या काळे याने घरात पाच लिटरने भरलेला पेट्रोलचा कॅन्ड अंगावर ओतून घेऊन हातात काडीपेटीतील काडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या वेळी आशाबाई शिंदे, काविंदा काळे यांनी पोलिसांना अडथळा करून गोंधळ केला व आनंद्या काळे यास पळून जाण्यास मदत केली. पोलिसांनी जादा कुमक मागवून राजकुमार काळे यास अटक केली. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर करीत आहेत.

loading image