esakal | "तू तर पेंडेमिकमधील सर्वांत मोठी आशा !' पोलिस अधीक्षक सातपुतेंनी केला कवितेतून "आशां'चा गौरव
sakal

बोलून बातमी शोधा

'तू तर पेंडेमिकमधील सर्वांत मोठी आशा !'

सोलापूरच्या जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी लक्ष वेधले असून, त्यांनी कवितेच्या माध्यमातून "आशा वर्कर्स'च्या व्यथा मांडल्या आहे. "आशा', तू या कोरोना महामारी काळातील सर्वांत मोठी आशा वाटतेस !' असे गौरवोद्गार त्यांनी कवितेतून व्यक्त केले आहे.

'तू तर पेंडेमिकमधील सर्वांत मोठी आशा !'

sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जसे देशभरातील डॉक्‍टर सज्ज झाले आहेत, त्याचप्रकारे आशा वर्कर्सही पदर खोचून कामाला लागल्या आहेत. शहर असो की गाव, घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची माहिती गोळा करण्याचं काम आशा वर्कर्स करत आहेत. परंतु त्यांना पाहिजे तितका मानसन्मान दिला जात नाही, तरीदेखील तुटपुंज्या मानधनावर त्या समाजसेवेचे व्रत हाती घेऊन, जीव धोक्‍यात घालून, कोरोना वॉरियर्स म्हणून काम करत आहेत. याकडे सोलापूरच्या जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी लक्ष वेधले असून, त्यांनी कवितेच्या माध्यमातून "आशा वर्कर्स'च्या व्यथा मांडल्या आहे. "आशा', तू या कोरोना महामारी काळातील सर्वांत मोठी आशा वाटतेस !' असे गौरवोद्गार त्यांनी कवितेतून व्यक्त केले आहे. (Superintendent of police tejaswi satpute praised the work of asha workers through poetry)

हेही वाचा: उपळाई बुद्रुकच्या शिंदे बंधूंचे सातासमुद्रापार पाऊल 

"मागील दीड वर्षापासून आशा वर्कर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. सध्या कोरोनाच्या काळात ग्रामस्तरावर घरोघरी जाऊन, आशा वर्कर्स कोरोनाबाबतची जनजागृती तर करतच आहेत, त्याचबरोबर दररोज प्रशासनाला माहिती देण्याचे काम देखील त्या नित्यनेमाने न चुकता करत आहेत. आशा वर्कर्स जीव धोक्‍यात घालून तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना आधार देण्याची जबाबदारी सरकारची आहे. "आशा वर्कर्स एवढे काम करून देखील नागरिकांकडून त्यांना योग्य सन्मान दिला जात नाही. या आशा वर्कर्सच्या कामाबद्दल कुणीच काही बोलत नसल्याची खंत आशा वर्कर्सच्या मनात आहे.

सध्याच्या कोरोना या महामारीच्या काळात आशा वर्कर्स यांचे काम उल्लेखनीय व गौरवास्पद, राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यासारखे असून देखील त्यांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. महिलांच्या व्यथा या महिलांनाच समजून येतात, असे म्हणतात ना त्याचाच प्रत्यय सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आशा वर्कर्सबद्दल कवितेच्या माध्यमातून त्यांच्या मांडलेल्या भावनांतून दिसून येतो.

हेही वाचा: बेभरवशाची नोकरी सोडून उपळाई येथील तरुण कमावतोय गांडूळ खत निर्मितीतून महिन्याला लाखो रुपये ! 

"सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय' या पोलिसांच्या ब्रीदवाक्‍याला साजेसे असे काम करत पोलिस खात्यात एक वेगळाच ठसा उमटवणाऱ्या तेजस्वी सातपुते यांनी आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढत. कवितेच्या माध्यमातून "आशा वर्कर्स'चा गौरव केला आहे.

त्यांनी मांडलेली कविता पुढीलप्रमाणे...

आशा

वर्ष सरले; पण तुझी वणवण कायम

माणसं तपासायला गेल्यावर कोणी पाणी विचारेना... कोणी सहकार्य करेना

तुझ्या पदरी पडतात उपेक्षाच

तू कुठून आणतेस एवढं बळ?

सुरुवातीला तर धड मास्कही नसायचे तुला

बेधडक घरोघरी जायचीस

सर्वांचं बेताल वागणं झेलूनही तपासणी करायचीस

थर्मामीटर ऑक्‍सिमीटर... दोनच शस्त्र लहान

पण चिकाटीनं वाचवलेस तू अनेक प्राण

माणसं मात्र स्वतःच्या जिवावर उठलेली

इथं जगण्याची भ्रांत; पण माणसं काहीही सेलिब्रेट करत सुटलेली

कुटुंबाचीच काय स्वतःचीही जबाबदारी नकोय कित्येकांना

तुझ्या प्रयत्नांचं, तुझ्या कष्टाचं नाही कुणी ठेवले मोल

तरीही कोरोनाच्या लढाईत सर्वात मोठा वाटा उचललास तू

बलिदानाचाही तुझाच पहिला मान

तू सामान्यातली सामान्य, तरी अशक्‍य वाटणारी काम करतेस

ASHA नाहीस तू तर पेंडेमिकमधील सर्वांत मोठी आशा वाटतेस...

- तेजस्वी सातपुते

(Superintendent of police tejaswi satpute praised the work of asha workers through poetry)

loading image
go to top