esakal | वारकरी व प्रवाशांच्या आशा पल्लवीत ! पंढरपूर-फलटण रेल्वेमार्गासाठी सर्व्हे सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

pdr Railway

रेल्वेच्या बांधकाम विभागाने तातडीने पंढरपूर- फलटण या मार्गाचे नव्याने सर्व्हे सुरू केला आहे. या मार्गाचा सर्व्हे सुरू झाल्याने या भागातील लोकांच्या रेल्वे प्रकल्पाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

वारकरी व प्रवाशांच्या आशा पल्लवीत ! पंढरपूर-फलटण रेल्वेमार्गासाठी सर्व्हे सुरू 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मागील आठ दिवसांपासून या रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्व्हे सुरू झाला आहे. येत्या काळात या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. दरम्यान, राज्य सरकारने या मार्गासाठी 700 कोटी रुपयांची तरतूद केल्यास येत्या काही वर्षांत या मार्गावरून प्रत्यक्षात वारकऱ्यांसाठी रेल्वे धावू शकणार आहे. 

वारकऱ्यांसाठी व पंढरपूर परिसरातील साखर, द्राक्ष, डाळिंबासह भाजीपाल मुंबई, पुण्यासह देशाच्या इतर भागात वेळेत पोच व्हावा यासाठी इंग्रजांनी सुमारे 100 वर्षांपूर्वी पंढरपूर- फलटण या 100 किलोमीटरचा रेल्वेमार्ग मंजूर केला आहे. या मार्गासाठी भूसंपादन देखील त्या काळी करण्यात आले आहे. दरम्यान, देश स्वतंत्र झाल्यानंतर हा मार्ग दुर्लक्षित झाला. दरम्यान, 2014 मध्ये माढ्याचे तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते- पाटील यांनी या प्रलंबित रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यशही आले. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गासाठी 100 कोटींची तरतूद देखील केली होती. 

अलीकडेच माढ्याचे खासदार तथा सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनीही या मार्गासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे या रेल्वे मार्गासाठी 1 हजार 400 कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार करून त्यास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये केंद्राने 700 व राज्य सरकारने 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी, असे प्रयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यामुळे पुन्हा या रेल्वे मार्गाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. 

राज्य सरकाने या मार्गासाठी 700 कोटींच्या गुंतवणुकीची हमी द्यावी, असे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिले आहे. मात्र त्यांच्या पत्राला राज्य सरकारने अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पालखी मार्गाला समांतर असणारा या रेल्वे मार्गाची फाईल लालफितीत अडकून पडली आहे. 

दरम्यान, माढ्याचे खासदार तथा सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी हा मार्ग सुरू करण्यासाठी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन या मार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली आहे. त्यानुसार येत्या अर्थसंकल्पात या मार्गाच्या कंपाउंड व सर्व्हेसाठी 45 कोटींची तरतूद केली जाणार आहे. 

रेल्वेच्या बांधकाम विभागाने तातडीने पंढरपूर- फलटण या मार्गाचे नव्याने सर्व्हे सुरू केला आहे. या मार्गाचा सर्व्हे सुरू झाल्याने या भागातील लोकांच्या रेल्वे प्रकल्पाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

पंढरपूर-फलटण या प्रलंबित रेल्वेमार्गासाठी नव्याने सर्व्हे सुरू झाला आहे. या मार्गासाठी केंद्राने 14 कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्यास मंजुरीही दिली आहे. यापैकी केंद्राने 700 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु राज्य सरकारने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निस्सीम विठ्ठलभक्त आहेत. पालखी मार्गाला हा रेल्वेमार्ग समांतर आहे. वारी काळात व इतर काळात वारकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. वारकरी आणि विठ्ठलभक्त असलेले मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्य सरकारच्या हिश्‍श्‍याचा भार उचालावा. 
- रणजितसिंह निंबाळकर, 
खासदार माढा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image