
Sushilkumar Shinde : विमानसेवा वादात आता सुशीलकुमारांची एन्ट्री !
सोलापूर : सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी आणि विमानसेवा यावरून सोलापुरात सध्या संघर्षाचे वादळ माजले आहे. कारखाना बचाव समिती आणि सोलापूर विकास मंच हे आमने-सामने ठाकले आहेत. दरम्यान विमानसेवा वाद प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून शांत राहिलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आपली भूमिका स्पष्ट करत या वादात उडी घेतली आहे.
‘होटगी रस्त्यावरील विमानतळावरून विमान सेवा सुरु होण्यास सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही,’ असे सांगून प्रवासी विमान सेवा सुरू होण्याबाबत ज्यांची ताकद आहेत, त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी सूचनाही ज्येष्ठ नेते शिंदे यांनी केली.
या प्रकरणात आपली भूमिका मांडताना
सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले की, सध्या सुरू असलेला वाद हा निरर्थक आहे. मी अनेकवेळा विमानातून आलो आणि गेलो. पण तेव्हा कधी हा प्रश्न आला नाही. आता अलीकडे माझ्या ७५ चा कार्यक्रम झाला, तेव्हा २८ विमानंं लॅडिंग झाली होती. तेव्हा असा कोणताही प्रश्न निर्माण झाला नव्हता. उलट ज्यांचं वजन आहे, अशा लोकांनी प्रवासी विमान सेवेबाबत संबंधित कंपन्यांकडे प्रयत्न केले पाहिजेत. होटगी रोडवरील विमानतळावरून विमान सेवा सुरु होण्यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही. आम्ही बऱ्याचदा त्याच विमानतळावर उतरतो, आजही उतरतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बोरामणी विमानतळाबाबत मी माझ्या काळात प्रयत्न केले. पण, पुढे पाठपुरावा करणे गरजेचे होते, असे सांगून शिंदे म्हणाले की, बोरामणी विमानतळासाठी २०१० पासून भूसंपादानाचे काम सुरू झालं. जमीन ताब्यात आल्यानंतर विमानतळाच्या संरक्षक भिंतीचे काम झालं. मी २०१४ पर्यंतच होतो, त्यानंतरचं मला माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात विमानसेवा आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी यावरून वाद पेटला आहे. त्याच वादावर आता ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केले. हे सर्व फूजूल आहे, असे म्हणत सोलापुरातून विमान सेवा सुरू होण्यास कोणताही अडथळा मला तरी वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी विमानसेवेसाठी चक्री उपोषण करणारे सोलापूर विकास मंचचे विकास शहा यांना सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांनी भरचौकात पिस्तूल काढून धमकावले होते. त्यानंतर मोठा वाद सोलापुरात झाला होता. मात्र, शिंदे यांनी या प्रकरणात भूमिका मांडून या वादामधील तीव्रता कमी केली आहे. त्यांच्या या भूमिकेने या प्रकरणाला वेगळे वळण लागणार ? सोलापूर विकास मंच आपलं आंदोलन मागे घेणार का ? हे पाहणे आता अत्यंत औत्सुक्याचे आहे.