esakal | निर्बंध म्हणत लादलेला लाॅकडाउन मागे घ्या : सोलापूरचे व्यापारी संतप्त  

बोलून बातमी शोधा

band dukane.jpg

शासनाने राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या रुग्ण संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी ब्रेक द चेनची अंमलबजावणी सुरू करणेबाबत आदेश दिले आहेत. 

निर्बंध म्हणत लादलेला लाॅकडाउन मागे घ्या : सोलापूरचे व्यापारी संतप्त  
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः कोरोनाच्या नावाखाली बाजारपेठ बंद करून अर्थचक्र विस्कळीत होत आहे. त्यामुळे बिगर जीवनावश्‍यक वस्तू व्यापाऱ्यांची दुकाने सुरु करण्याबाबत राज्य शासनाने "ब्रेक द चेन' या निर्णयाचा फेरविचार करावा अशी, भूमिका सोलापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सने मांडली आहे. चेंबरचे अध्यक्ष राजू राठी व सचिव धवल शहा यांनी मुख्यमंत्र्याना पत्र देत ही भूमिका घेतली आहे. 
शासनाने राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या रुग्ण संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी ब्रेक द चेनची अंमलबजावणी सुरू करणेबाबत आदेश दिले आहेत. 
रविवारी (ता.4) मंत्री परिषदेची बैठक घेऊन विकेंड लॉकडाऊनचे नियमावली करत शनिवार व रविवार कडक असे विकेंड लॉकडाऊन लागणार आहे, असे घोषित केले. परंतु जेव्हा प्रत्यक्षात आदेश निघाले त्यामध्ये अचानक घुमजाव झाला. आदेशामध्ये क्रं.3 नुसार सर्व दुकाने, मार्केट व मॉल दिवसभर बंद राहतील. याचा अर्थ असा झाला फक्त बिगर जीवनावश्‍यक वस्तुंची दुकाने सुमारे 25 दिवस बंद ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे अन्याय झाला आहे, असे सर्व व्यापाऱ्यांना वाटत आहे. 
त्यामुळे व्यापारी उघडपणे या निर्णयाचा विरोध करत आहेत. भरीसभर म्हणुन ई-कॉमर्स व्यापाराला परवानगी दिली आहे. यामुळे व्यापाऱ्यामध्ये प्रचंड अशी नाराजी आहे. सर्वसामान्य छोटे-मोठे दुकानदांर यांनी कपडे, रेडिमेड, भांडी, स्टेशनरी, इलेक्‍ट्रीक, इलेक्‍ट्रॉनिक (पंखा, कुलर, फ्रीज) वस्तु, ऍटोमोबाईल्स स्पेअर पार्टस, मशिनरी स्पेअर्स पार्टस, सिमेंट, स्टील, फर्निचर, मोबाईल्स शॉप, फुटवेअर आदी वस्तू ह्या ऑनलाइन जर विकल्या तर बाकीच्या सर्व व्यापारी वर्गांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होऊन अतोनात आर्थिक नुकसान होणारच आहे. यासाठी बिगर जीवनावश्‍यक वस्तुंची दुकाने सुरु करण्यास आठवड्यातील 5 दिवसतरी (सोमवार ते शुक्रवार) परवानगी देण्यात यावी व त्याप्रमाणे सुधारीत आदेश पारीत करावेत. अनेक व्यापारी जे गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीशी झगडत मोठ्या संकटातून बाहेर पडलेले नाहीत. त्यातच केवळ बिगर अत्यावश्‍यक दुकानांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही यास कडक निर्बंधाच्या नावाखाली 100 टक्के लॉकडाऊनच समजतो, अशी टिका या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.