
आता धर्मापलीकडील भोंग्यांची चर्चा!
सोलापूर : धार्मिक स्थळांच्या भोंग्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता शहरातील बसस्थानक आणि रेल्वे स्थानकातील रेल्वेची आणि बसची माहिती देण्यासाठी लावण्यात आलेले धर्मापलीकडील भोंगे (कर्णे) देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वादामुळे चर्चेचा विषय बनले आहेत.
बसस्थानक आणि रेल्वे स्थानकातील भोंग्यांवरून ध्वनिक्षेपकाचे नियम व अटी पाळून बस आणि रेल्वेची उद्घोषणा केली जाते. यामुळे सध्या बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरील भोंग्यांबाबत नागरिकांमध्ये चर्चा होत असताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या भोंग्यांच्या आवाजावर त्या - त्या नियंत्रण कक्षाकडून नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे संबंधित एसटी व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे एकंदरीतच, राज्यातील राजकीय भोंग्यांवरून सुरू असलेल्या राजकारणात बस व रेल्वे स्थानकातील भोंग्यांचीही भर पडत आहे. बस व रेल्वेस्थानकावर प्रवाशांमध्ये आता भोंग्यांची चर्चा होत असताना ऐकण्यास मिळत आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकातून बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना माहिती देण्यासाठी भोंग्याद्वारे उद्घोषणा होत असते. सोलापूर बसस्थानकात स्पीकर लावण्यात आले असले तरी यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा विभागातील कर्मचाऱ्यांकडे आहे. आवाजाची मर्यादा ही तेथील कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. बसस्थानकाच्या आवारात असलेल्या प्रवाशांच्या माहितीसाठी होणारी उद्घोषणा मर्यादित असणे गरजेचे आहे. मात्र बसस्थानकातून होणारी उद्घोषणा तब्बल बसस्थानक परिसराच्या परिघापर्यंत ऐकण्यास येते. रात्रीच्या वेळी शांतता असल्याने आवाज देखील मर्यादित ठेवण्यात येतो.
त्याचबरोबर रेल्वे स्थानकावरील स्पीकरच्या आवाजाची मार्यादा ही स्टेशन परिसरापर्यंत ऐकण्यास येईल इतकीच असते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, रात्री दहानंतर दोन्ही ठिकाणी आवाजाची मर्यादा कमी असते. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत सुरू असलेल्या वादावरून बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरील भोंग्यांचा विषय आता प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
बसस्थानकावर लावण्यात आलेल्या स्पीकरच्या आवाजाची मर्यादा नियमानुसार ठेवण्यात आली आहे. प्रवाशांना माहिती मिळावी तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.
- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर बसस्थानक
रेल्वे स्थानकावरील गाड्यांची माहिती प्रवाशांना कळावी यासाठी स्पीकर लावण्यात आले आहेत. मात्र आवाज हा मर्यादित आणि स्थानक परिसरातच ऐकण्यास येईल इतका मर्यादित असतो.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (रेल्वे)
Web Title: Talk Bongs Beyond Religion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..