Temperature : सोलापुरात ४३.२ अंश सेल्सिअसची नोंद; पुढील दोन दिवस पुन्हा ४४ पारा

सोलापूर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू लागला आहे.
Temperature
Temperatureesakal

सोलापूर - सोलापूर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू लागला आहे. पुढील दोन दिवस (शनिवार व रविवार) सोलापूर शहर व परिसरात ४४ अंश सेल्सिअस तापमान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज सोलापूर शहर व परिसरात ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

सकाळी नऊपासून सुरू होणारा उन्हाचा कडाका सायंकाळपर्यंत कायम राहत आहे. रात्री उशिरापर्यंत उष्ण झळा जाणवत आहेत. मे महिन्याच्या सुरवातीपासूनच सोलापूरच्या तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू लागल्याने शेवटच्या टप्प्यातील उन्हाळा जड जाऊ लागला आहे.

सोलापुरात ६ व ७ मे रोजी ४२ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहील, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोलापूर, माढा, धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होणार आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आग ओकणाऱ्या सूर्याची परवा न करता कार्यकर्ते, नेते व उमेदवार प्रचारासाठी दिवसभर फिरताना दिसत आहेत. दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका अधिक असल्याने घराबाहेर पडणे शक्यतो अनेकजण टाळू लागले आहेत.

वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गमजा, रुमाल, पांढरे कपडे वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. थंड पदार्थ व थंडपेये या माध्यमातून उन्हाची ढग कमी केली जात आहे.

मेमध्ये मुसळधार अवकाळी

मे महिन्यात सोलापुरात जेवढा उन्हाचा कडाका असतो, तेवढाच जोरदार अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याचाही आजपर्यंतचा अनुभव आहे. सोलापूर शहर व परिसरात ६ मे २०१५ रोजी ५४.३ मिलिमीटर व १० मे २०२१ रोजी ५७.८ मिलिमीटर अवकाळी पाऊस एका दिवसात झाल्याच्याही नोंदी आहेत. मे महिना हा सोलापूरसाठी कधी उन्हाळा तर कधी पावसाळा असाच अनुभव देणारा जात आहे.

मेमध्ये ४५ अंश सेल्सिअसचा उच्चांक

सोलापूर शहर व परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये मे महिन्यात सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाचा उच्चांक झाल्याच्या नोंदी आहेत. सोलापुरात २२ मे २०१९ व २६ मे २०२० रोजी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. या महिन्यात सोलापुरात सरासरी ४२ ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहत असल्याचाही आजपर्यंत अनुभव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com