esakal | तर बार्शी तालुक्‍याव्यतिरिक्त इतर रुग्णांना दाखल करून घेणार नाही ! आमदार राऊतांचा इशारा

बोलून बातमी शोधा

Rajendra Raut
तर बार्शी तालुक्‍याव्यतिरिक्त इतर रुग्णांना दाखल करून घेणार नाही ! आमदार राऊतांचा इशारा
sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठी गंभीर असून, दिवसेंदिवस फैलाव होताना दिसत आहे. उपचाराअभावी मृत्यू होत आहेत. कोव्हिड हॉस्पिटल, कोव्हिड सेंटर येथील बेड शिल्लक नाहीत. ऑक्‍सिजन, रेडमेसिव्हीर इंजेक्‍शन उपलब्ध होत नाहीत. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी निर्णय घेतला असून, दहा दिवस तालुका अत्यावश्‍यक सेवा वगळता कडकडीत बंद असेल, अशी घोषणा आमदार राजेंद्र राऊत यांनी केली.

यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे झालेल्या बैठकीत आमदार राऊत बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, तहसीलदार सुनील शेरखाने, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका वैद्यकीय अभिकारी डॉ. अशोक ढगे, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, विश्वास बारबोले, नागेश अक्कलकोटे उपस्थित होते.

हेही वाचा: भोसेतील सर्व कुटुंबांची होणार कोरोना टेस्ट ! प्रसंगी होणार पोलिस बळाचा वापर

आमदार राऊत म्हणाले, पाच दिवसांत केवळ 20 रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन प्रशासनाकडून मिळाले. ऑक्‍सिजन उपलब्ध होत नाही. उद्योग- व्यवसाय पुन्हा सुरू होतील पण जीव परत मिळणार नाही. लॉकडाउन केले नाही तर दहा दिवसांनी परिस्थिती हाताबाहेर जाईल.

...तर दोन दिवसांनी फक्त बार्शी तालुक्‍यातील रुग्णांवरच उपचार होतील

बार्शी शहरात 80 टक्के रुग्ण आसपासच्या 11 तालुक्‍यांतील आहेत. माणुसकीमधून उपचार करतो आहोत आणि रुग्णांचा नैसर्गिक हक्क आहे. कोरोना रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्त आहेत. तेथील खासदार, आमदार फक्त मते मागणीसाठी आहेत का? जनतेला वाऱ्यावर सोडत आहेत. कारखाने उभा करतात पण हॉस्पिटल उभा करू शकत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करून, उस्मानाबाद येथील जनतेने जाब विचारावा. उस्मानाबाद जिल्हाधिकारी फोन उचलत नाहीत. तामलवाडी येथून ऑक्‍सिजनची मागणी केली तर दिला नाही. इंजेक्‍शन देत नाहीत. त्यामुळे त्यांची दोन दिवस वाट पाहू, त्यानंतर बार्शी तालुक्‍याव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही, असा इशारा आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला आहे.

येथील प्रशासनाच्या अधिकारामध्ये हा निर्णय घेण्यात आला असून, कारवाई झाली तर संपर्क साधू नका. प्रशासनाच्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही. नागरिकांना अडचण आली तर नगरसेवकांशी संपर्क साधा. जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल, असेही आमदार राऊत यांनी या वेळी जाहीर केले.