दहा वर्षाची सक्तमजुरी! आवडत्या मुलीशी विवाह लावून देत नसल्याने वहिनीच्या खूनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news
दहा वर्षाची सक्तमजुरी! आवडत्या मुलीशी विवाह लावून देत नसल्याने वहिनीच्या खूनाचा प्रयत्न

दहा वर्षाची सक्तमजुरी! आवडत्या मुलीशी विवाह लावून देत नसल्याने वहिनीच्या खूनाचा प्रयत्न

सोलापूर : आवडत्या मुलीशी विवाह लावून देत नसल्याच्या रागातून दिराने भावजयीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी न्यायालयाने दिराला दहा वर्षांची सक्तमजुरी व ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. बाळू लक्ष्मीपती भंडारी (वय ३०, रा. नीलमनगर, राघवेंद्र नगराजवळ) असे आरोपीचे नाव आहे.

नीलम नगरातील शोभा भंडारी या विडी कामगार असून, त्यांचा दीर आरोपी बाळू भंडारी हा त्यांच्या घरी नेहमी ये-जा करीत असे. त्याचे एका मुलीसोबत संबंध होते आणि घरातील सर्वजण त्याची समजूत काढत होते. तरीपण, तो मला त्याच मुलीसोबत विवाह करायचा म्हणून घरातील सर्वांसोबत भांडण करीत होता. १ एप्रिल २०१८ रोजी दुपारी साडेबारा वाजता तो शोभा भंडारी यांच्या घरी गेला. त्यावेळी ‘तुम्ही मला माझ्या आवडीच्या मुलीशी विवाह का करू देत नाहीत’ अशी विचारणा करू लागला. तेव्हा फिर्यादी म्हणाल्या, ‘तुझा भाऊ आल्यावर घरी ये, आपण बोलू.’ त्यावेळी रागाला गेलेल्या बाळूने सोबत आणलेल्या ब्लेडने शोभा यांच्या गळ्यावर वार केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तो तेथून पळून गेला. गोंधळ ऐकून शेजारील निर्मला विवेकानंद करणकोट या शोभा भंडारी यांच्या घरी गेल्या. त्यावेळी त्यांनी जखमी शोभाला पोलिस ठाण्याला नेले आणि तेथून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळेत दवाखान्यात गेल्याने शोभा भंडारी यांचा जीव वाचला. त्यांनी वळसंग पोलिसांत फिर्याद दिली आणि आरोपी बाळूला अटक झाली. काही दिवसांनी तो बाहेर आला, न्यायालयात साक्ष सुरू असतानाच दोन महिन्यांपूर्वी पसार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला भावजयीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाळू भंडारीला दोषी ठरवले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व ५० हजारांचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.

नऊ साक्षीदारांची साक्ष ठरली महत्त्वाची

या गुन्ह्यात सरकारतर्फे नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यात फिर्यादी, शेजारील व ज्या दुकानातून आरोपीने ब्लेड खरेदी केले त्या दुकानदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. यामध्ये सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲड. एन. बी. गुंडे, ॲड. माधुरी देशपांडे यांनी तर आरोपीतर्फे ॲड. एम. एस. कुरापती यांनी काम पाहिले. कोर्टपैरवी म्हणून शीतल साळवी यांनी मदत केली.