सोलापूर : BMT मुळे थॅलेसिमियामुक्ती शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 डॉ. सतीश पवार

सोलापूर : BMT मुळे थॅलेसिमियामुक्ती शक्य

सोलापूर: थॅलेसिमियासारखे दुर्मिळ रक्ताचे आजार आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) तंत्राचा पर्याय आवाक्यात आल्याने राज्यातील अंदाजे एक लाख मुलांना बोन मॅरो डोनरच्या मदतीने पूर्ण जीवन जगण्याचा मार्ग मोकळा होऊ लागला आहे.

ॅथॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकल सेल ॲनिमिया या रक्ताच्या आजारांवर आयुष्यभर उपचार घेण्याची गरज पूर्वी होती. थॅलेसिमिया आजारात जन्मलेल्या बाळास शरिरात रक्त तयार होत नसल्याने वयाच्या तिसऱ्या महिन्यापासून त्यास आयुष्यभर रक्त द्यावे लागते. हिमोफिलिया आजारात रक्त गोठवणारा फॅक्टर एट हा घटक त्यांच्या रक्तात नसल्याने त्यांना बाहेरून सातत्याने द्यावा लागतो. अन्यथा जखम झाल्यास रक्त गोठत नसल्याने ते जीवघेणे ठरते. सिकलसेल ॲनिमियामध्ये काही अंतराने रक्त द्यावे लागते. विशेष म्हणजे या आजारात उपचार करून देखील रुग्णांचे आयुष्यमान पूर्ण होण्यास काही अडचणी येत असतात. ती अडचण येऊ नये यासाठी कुटुंबाने योग्य काळजी घेतली पाहिजे.

या आजारातून मुक्त होण्यासाठी आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) तंत्र विकसित व स्वस्त झाल्याने त्याचा उपयोग करणे शक्य होत आहे. राज्यात नोंदणीकृत व नोंदणी नसलेली अंदाजे एक लाख मुले आहेत. या जीवघेण्या आजारातून त्यांना मुक्त होण्याची संधी या तंत्राने उपलब्ध केली आहे. यासाठी कोल इंडिया उद्योगाने शस्त्रक्रियांसाठी मदत सुरू केली आहे.

बीएमटी शस्त्रक्रियाबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. या शस्त्रक्रिया सुरवातीला मुंबई, नागपूर, घाटी (औरंगाबाद) अशा प्रमुख शासकीय रुग्णालयांत सुरू व्हाव्यात असा प्रयत्न आहे. रक्तपेढ्यांकडून या रुग्णांची माहिती मागवली आहे. या शस्त्रक्रियेमध्ये निर्जंतुकीकरण ही तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक बाब आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेचा निधी अपुरा होत असल्याने केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. सध्या दोन उद्योगांशी टायअप करून महिन्याला दोन बीएमटी शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत.

- डॉ. सतीश पवार, अतिरिक्त मिशन संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन, मुंबई

थॅलेसिमिया व इतर रक्त आजारांच्या संदर्भात बीएमटीमुळे दिलासा मिळाला आहे. पण या शस्त्रक्रियेसाठी १५ ते २५ लाख रुपये खर्च येतो. शासनाने महात्मा फुले आरोग्य व आयुष्यमान योजनेतून ही शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात करून द्यावी, तसेच पाच विभागांचा एक विभाग करून तेथे बीएमटी सेंटर सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना हाती घ्यावी, असा या आजाराच्या रुग्णांच्या पालकांची मागणी आहे.

- बरकत पन्हाळकर, अध्यक्ष, समवेदना मेडिकल फाउंडेशन, कोल्हापूर