esakal | कोव्हिड सेंटरसाठी डॉक्‍टरांनी पुढाकार घेतल्यास प्रशासन सहकार्य करेल ! प्रांताधिकाऱ्यांची ग्वाही

बोलून बातमी शोधा

Covid Center
कोव्हिड सेंटरसाठी डॉक्‍टरांनी पुढाकार घेतल्यास प्रशासन सहकार्य करेल ! प्रांताधिकाऱ्यांची ग्वाही
sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : शहर व ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी प्रशासनाचे प्रयत्न देखील युद्धपातळीवर सुरू आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात कोव्हिड सेंटर सुरू करण्यासाठी खासगी डॉक्‍टरांनी यात पुढाकार घेतल्यास त्यासाठी प्रशासनाच्या वतीने सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर तालुक्‍यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाला असून, ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरीही प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 27 गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निश्‍चित केले. या गावांमध्ये दररोज दोन हजार चाचण्या केल्या जात आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचे तत्काळ शहर व बालाजीनगर येथे विलगीकरण केले जात असून, त्यावर उपचार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने या गावांमध्ये घाबरून न जाता कोरोना नियमांचे पालन करण्याबाबतचे आवाहन केले जात आहे. तर आरोग्य खात्याच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांची चाचणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले. विलगीकरणास विरोध करणाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्याचे आदेश ग्रामस्तरीय समितीला दिले आहेत.

हेही वाचा: सोलापूरला "बाप'च नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध ! हेवेदावे विसरून आतातरी सर्वपक्षीय नेते एकत्र येतील का?

अशा परिस्थितीत काही लोकांना वैद्यकीय उपचारासाठी तालुक्‍याच्या बाहेर जावे लागत आहे. ते आर्थिकदृष्ट्या महागडे होत आहे. शासनाच्या वतीने पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णांना कमी खर्चात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, इतर गावात देखील वैद्यकीय सुविधा देण्याच्या दृष्टीने आता खासगी डॉक्‍टरांनी कोव्हिड सेंटरसाठी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्‍यक ते सहकार्य केले जाईल. त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधला तरी चालेल, असे आवाहन प्रांताधिकारी भोसले यांनी केले.