esakal | दहावी परीक्षा रद्दचा काय होणार परिणाम? स्पर्धात्मक युगात गुणवत्तेचा प्रश्‍न ऐरणीवर

बोलून बातमी शोधा

Exam
दहावी परीक्षा रद्दचा काय होणार परिणाम? स्पर्धात्मक युगात गुणवत्तेचा प्रश्‍न ऐरणीवर
sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : देश बंद झाला तर..., परीक्षा बंद झाल्या तर..., शाळा बंद झाल्या तर..., कंपन्या बंद पडल्या तर..., देऊळ बंद झाले तर.., एकेकाळी असे एक ना अनेक काल्पनिक निबंध विद्यार्थ्यांना शाळेत लिहिण्यासाठी दिले जायचे. हे निबंध लिहीत असताना कुणालाही वाटले नव्हते, की हे सत्यात उतरेल. परंतु सध्याची परिस्थिती ही कल्पना करण्यापलीकडची झाली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे ऑनलाइन सुरू असलेल्या शिक्षणाचा अखेर, दहावीच्या परीक्षा रद्द तर पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश झाला असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये "कही खुशी कही गम' तर, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

माणूस किती जरी मोठा झाला तरी आयुष्यभर विद्यार्थीच असतो. या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा प्राथमिक व माध्यमिक शाळेत होत असतो. परंतु अचानक आलेल्या कोरोना या महामारीमुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थ्यांना शाळेचे तोंड देखील न बघता पुढच्या वर्गात प्रवेश मिळाल्याने, या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वर्षभरापासून शाळा बंद असल्याने, मोबाईलद्वारे सर्वांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.

हेही वाचा: तिढा अकरावी प्रवेशाचा ! मूल्यांकनानंतरच प्रवेश; सायन्ससाठी होईल अंतर्गत चाचणी

इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या या जमान्यात मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणाईला ऑनलाइन शिक्षणाचा कितपत फायदा होतो हा येणारा काळच सांगेल. सध्या बरेच विद्यार्थी मोबाईलवर अभ्यास कमी व गेम्स जास्त खेळत असल्याचे पालक ओरडताना दिसतात. त्यामुळे ऑनलाइन अभ्यासामुळे विद्यार्थी "अभ्यास करो अथवा न करो' मात्र मोबाईलच्या आहारी नक्कीच गेले आहेत. अन्‌ त्यातच शासनाने ऑनलाइन अभ्यासाची परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिल्याने, स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी तपासावी? याबाबत पालकांमध्ये चिंता आहे.

तसेच शैक्षणिकदृष्ट्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टर्निंग पॉइंट असतात. विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत असतात. त्यामुळे शासनाने देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरी कमी झाला असताना या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू केल्या होत्या. परंतु पुन्हा मार्च महिन्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने परीक्षा पुढे ढकलल्या व सध्या दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असल्याने, प्रथमच दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे टक्केवारीसाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण तर अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये "परीक्षा रद्द झाल्याने' आनंदाचे वातावरण आहे. तर पालक मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक प्रवेशाच्या बाबतीत संभ्रमात आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे कामगार, मजूर, शेतकरी, व्यापारी यांच्याबरोबरच विद्यार्थ्यांचेही भरून न निघणारे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे.

कोरोनामुळे काल्पनिक निबंध उतरले सत्यात

काल्पनिक निबंधासाठी पूर्वी "हे बंद झाले तर..., ते बंद झाले तर...' असे निबंध दिले जायचे. विद्यार्थीही हे कधीही होऊ शकणार नाही त्यामुळे आपल्या कल्पनांना मुक्तपणे वाव देत असायचे. परंतु सध्या हे सर्व सत्यात उतरले असून सध्याच्या विद्यार्थ्यांना याचा अनुभव घेता येत आहे. याबाबतचे गमतीदार मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ग्रामीण भागातील मुलं शासनाच्या या धोरणामुळे शहरी भागातील मुलांपेक्षा कितीतरी पटीने पिछाडीवर पडतील व भविष्यात बेकारीमध्ये वाढ होईल. शहरी भागातील मुले ही नोकरदार वर्गातील असल्याने त्यांना स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन घरातून मिळू शकते; परंतु शेतमजूर, कामगार अशा ग्रामीण भागातील मुले परीक्षा नसल्याने अभ्यासच करणार नाहीत, त्यामुळे स्पर्धात्मक युगात या मुलांची गुणवत्ता टिकणार नाही. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे निर्णय घेऊ नयेत.

- अब्दुलरहीम पठाण, माजी शिक्षक, रयत शिक्षण संस्था

दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी आयुष्यातील पहिली मोठी स्पर्धात्मक परीक्षा असते. यातून विद्यार्थ्यांना अनुभव येतो. या परीक्षेतून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पालकांना समजते. परंतु सध्या परीक्षाच नसल्याने, विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत पालकांमध्ये नक्कीच संभ्रम निर्माण होत आहे.

- सुधीर शेटे, पालक, उपळाई बुद्रूक