esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप

शहर भाजपमध्ये कधी अंतर्गत गटबाजी तर कधी पदाधिकारी अन्‌ प्रशासनातील वाद यामुळे गेल्या पाच वर्षात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे कारभार हे भरकटलेल्या अवस्थेतच सुरू आहे.

प्रशासनावरील नियंत्रण हरवलेला शहर भाजप!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर भाजपमध्ये (BJP) कधी अंतर्गत गटबाजी तर कधी पदाधिकारी अन्‌ प्रशासनातील वाद यामुळे गेल्या पाच वर्षात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे कारभार हे भरकटलेल्या अवस्थेतच सुरू आहे. प्रशासनावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेला भाजप कधी आयुक्‍तांची तर कधी सीईओ यांच्या विरोधात तक्रार करण्यात धन्यता मानत आहे. प्रशासनाला विश्‍वासात घेऊन नागरी समस्या सोडविणे हे भाजपला जमले नसल्याचे आजपर्यंतच्या कारभारावरून दिसून येत आहे.

हेही वाचा: भाजपच्या माजी मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात विरोधी एकही नाही नगरसेवक

मोदी लाटेमुळे सोलापूर महापालिकेत तब्बल 50 वर्षांनंतर सत्ता बदल झाली. शहरवासीयांनी मोठ्या विश्‍वासाने भाजपला मोठ्या सदस्य संख्येने सभागृहात पाठविले. पाणी, रस्ते, दिवाबत्ती आदी मूलभूत सुविधांच्या माध्यमातून सोलापूर शहराला स्मार्ट बनविण्याचे स्वप्न भाजपने दाखविले. मात्र, प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भापजने केवळ तक्रारी आणि गटबाजीशिवाय शहराला काहीच दिले नाही. सुरवातीला केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्या वेळी दोन देशमुखांनी पदाधिकारी निवडीतील गटबाजी ही सातासमुद्रापार नेली. या गटबाजीतून महापौर व सभागृहनेता वाद कायम राहिला आणि शहर विकासाच्या कामांना खो बसला. केंद्र व राज्य शासनाने शहराला भरपूर निधी उपलब्ध करून दिला. तो निधी श्रेयवादात अडकून राहिला.

दरम्यान, राज्यात सत्तापालट झाली. भाजपमधील अंतर्गत गटबाजी मावळली. मात्र, पदाधिकारी व प्रशासन असा वाद उफाळून येऊ लागला. प्रशासनावर अंकुश ठेवून शहरातील कामे मार्गी लावण्याऐवजी महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासन अधिकाऱ्यांच्या वादात उडी घेत सत्ताधारी विरोधकाची भूमिका बजावत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सोयीचे राजकारण करत स्मार्ट रस्त्यांसाठी सीईओंच्या पाठीशी राहून उपमुख्यमंत्र्यांकडे आयुक्‍तांची तक्रार केली. तर आता समांतर जलवाहिनीसाठी आयुक्‍तांना पाठीशी घालत सीईओंची तक्रार केंद्र शासनाकडे करीत आहेत.

हेही वाचा: सोलापुरात गांधीजींची कॉंग्रेस हायंच कुठं..?

गेल्या दोन वर्षांपासून शहरातील मुख्य परिसरातील खोदलेले रस्ते "जैसे थे'च आहेत. शहरात नुसतेच पोल उभारले, दिवे तर लागलेच नाहीत. या पाच वर्षातही दोन दिवसांआड पाणी शहरवासीयांना मिळालेच नाही. नागरिकांच्या मिळकत करासह बांधकाम परवान्याच्या शुल्कात वाढ झाली. मूलभूत सुविधांचा तर बोजवाराच उडाला. आदी समस्यांवर सत्ताधारी हाताची घडी तोंडावर बोट ठेवतात. गेल्या पाच वर्षात गटबाजी, वादाच्या ग्रहणात अडकलेल्या भाजपला शहर विकास साधता आलाच नाही. सत्तेत बदल घडवूनही सोलापूरकरांची स्थिती "जैसे थे'च आहे, हे सोलापूरकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

बातमीदार : प्रमिला चोरगी

loading image
go to top