esakal | रुग्णांचा कोरोनाशी, नातेवाइकांचा प्रशासनाशी संघर्ष! ढेपाळली "सर्वोपचार'ची यंत्रणा
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

रुग्णांचा कोरोनाशी, नातेवाइकांचा प्रशासनाशी संघर्ष! ढेपाळली "सर्वोपचार'ची यंत्रणा

sakal_logo
By
प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट किती गंभीर आहे, याचा अंदाज आता सर्वांनाच येऊ लागला आहे. बाधित रुग्ण कोरोनाशी संघर्ष करत आहेत तर त्यांचे नातेवाईक बेड, ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हीर मिळविण्यासाठी प्रशासनासोबत दिवस-रात्र झगडत आहेत. गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाची सध्याची स्थिती विदारक आहे. गरिबांना चिंतेत टाकणारी आहे.

घरातील व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याला चांगले उपचार मिळावेत यासाठी रुग्णांची बेड शोध मोहीम सुरू होते. महापालिकेच्या डॅशबोर्डवरील उपलब्ध बेडची स्थिती पाहून रुग्णाचे नातेवाईक बहुतांश हॉस्पिटलशी संपर्क साधतात. डॅशबोर्डवर बेड उपलब्ध दाखवत असताना देखील अनेक रुग्णालये सुरवातीलाच नकारघंटा वाजवतात. आमच्याकडे बेड उपलब्ध नाहीत, असेच पहिले उत्तर देतात. कुठेच व्यवस्था होत नसल्याचे पाहून शेवटी अनेक रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. खासगी रुग्णालयाकडे बेड नाहीत आणि सर्वोचार रुग्णालयात बेड मिळालाच तर येथील अस्वच्छता आणि विदारक स्थितीचा सामना रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना करावा लागत आहे.

सर्वोपचारमधील रुग्ण कोरोनाशी तर त्या रुग्णाचे नातेवाईक येथील प्रशासनाची प्रचंड संघर्ष करत आहेत. ए ब्लॉकमध्ये असलेल्या बारा वॉर्डासाठी अवघ्या चार सर्व्हंटची सध्या नियुक्ती केली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर आवश्‍यक त्या वस्तू, स्वच्छता या बाबी हाताबाहेर गेल्या आहेत. रुग्ण ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी दिवसातून किमान तीन वेळा स्वच्छता आवश्‍यक असताना दिवसातून एकदाच स्वच्छता केली जात असल्याचे समोर येत आहे. कोरोनापेक्षाही सर्वोपचारमधील स्वच्छता व सुविधा भयावह असल्याचा अनुभव अनेक रुग्ण सांगत आहेत.

समन्वयाचा फटका

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व प्रशासनाचे अपुरे पडणारे प्रयत्न सर्वोपचारमधील व्यवस्थेवरून प्रकर्षाने दिसून येऊ लागले आहेत. सर्वोपचारमध्ये दाखल झालेले अनेक रुग्ण स्वतःहून हे रुग्णालय सोडून अन्य ठिकाणी जात असल्याचेही समोर आले आहे. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण संख्या सध्या सर्वोपचारमध्ये दाखल झाले आहे. परंतु रुग्णांच्या सेवेसाठी, स्वच्छतेसाठी आवश्‍यक असलेले मनुष्यबळ नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना अनेक विदारक व वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वोपचार रुग्णालयाने ज्या पद्धतीने चांगली सेवा दिली तशी सेवा या दुसऱ्या लाटेत अपेक्षित आहे. प्रशासनातील समन्वयाच्या अभावाचा मोठा फटका रुग्ण व रुग्णाच्या नातेवाइकांना बसताना दिसत आहे

कक्ष नुसताच नावाला, माहिती मिळेना नातेवाइकांना

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची तब्येत कशी आहे? त्यांना कोणत्या गोष्टीची आवश्‍यकता आहे? ते कधी बरे होतील? याबाबतची ठोस माहिती सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाच्या नातेवाइकांना मिळत नाही. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक कायम चिंतेत व मानसिक तणावात राहतात. सर्वोपचार रुग्णालयात असलेल्या मदत कक्षातून पूर्वी रोज सकाळी दहा वाजता नातेवाइकांना रुग्णाच्या तब्येतीची माहिती दिली जात होती. सध्या कक्ष आहे, परंतु माहिती मिळत नाही. या मदत कक्षाचे उंबरे झिजविण्यातच अनेकांचा जीव मेटाकुटीला येत आहे.