esakal | अठरा लाख व्यक्‍ती लसीकरणापासून दूर! जिल्ह्यासाठी आणखी 66 लाख लसींची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना लस

कोरोनाला आवर घालून तिसरी लाट रोखण्यासाठी 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली जात आहे.

Solapur : अठरा लाख व्यक्‍ती कोरोना लसीकरणापासून दूरच !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाला (Covid-19) आवर घालून तिसरी लाट रोखण्यासाठी 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोनावरील प्रतिबंधित लस (Covid-19 Vaccine) टोचली जात आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील 35 लाख 78 हजार 32 व्यक्‍तींना लस टोचणे अपेक्षित आहे. परंतु, जानेवारी ते 1 ऑक्‍टोबर या काळात जिल्ह्यातील 17 लाख 70 हजार व्यक्‍तींना पहिला डोस टोचण्यात आला आहे. तर त्यातील साडेपाच लाख व्यक्‍तींनी दुसरा डोस टोचून घेतला आहे. अजूनही जिल्ह्यातील 18 लाख व्यक्‍ती लसीकरणापासून (Vaccination) दूरच असल्याची स्थिती आहे.

कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचताना आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइनवरील कर्मचारी, 18 ते 44 वयोगटातील तरुण, 45 ते 60 आणि 60 वर्षांवरील व्यक्‍ती, असे टप्पे करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 42 हजार 359 आरोग्य कर्मचाऱ्यांनी तर जवळपास 79 हजार फ्रंटलाइनवरील कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस टोचून घेतले आहेत. मात्र, उर्वरित टप्प्यांवरील व्यक्‍तींपैकी 50 टक्‍के व्यक्‍तींना लस मिळालेली नाही.

गावोगावी लसीकरण केंद्रे करून ही मोहीम आटोक्‍यात आणायला हवी. परंतु, शहरातील जवळपास 40 तर ग्रामीणमधील 91 केंद्रांवरच लसीकरण सुरू आहे. दोन्ही लाटांचा अनुभव पाठीशी असतानाही नागरिकांकडून नियमांचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. तरीही, प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचल्याने जिल्ह्याचा मृत्यूदर आटोक्‍यात आला आणि कोरोनामुक्‍तीचे प्रमाणही वाढले. या पार्श्‍वभूमीवर पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा व्हावा, गावोगावी लसीकरण सुरू झाल्यास निश्‍चितपणे कोरोनाच्या पुढील लाटेचा धोका कमी होणार आहे.

हेही वाचा: बोरामणी विमानतळप्रश्‍नी 'चेम्बर'चे शरद पवारांना साकडे!

घरोघरी लस, नुसतीच घोषणा!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णवाढ व मृत्यूदरात महाराष्ट्र देशात अव्वल राहिले. ते प्रमाण कमी करण्याच्या हेतूने राज्यातील नागरिकांना घरबसल्या लस टोचण्यासंदर्भात घोषणा झाली. मात्र, त्याची अजूनपर्यंत सुरवात झालेली दिसत नाही. परंतु, कोरोनाच्या पुढील संभाव्य लाटेचा अंदाज घेऊन गावोगावी लसीकरणाचे कॅम्प घेऊन लसीकरण पूर्ण केल्यास निश्‍चितपणे मृत्यूदर रोखण्यात यश मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याची गरजही व्यक्‍त केली जात आहे.

लसीकरणाची तालुकानिहाय स्थिती (जानेवारी ते 1 ऑक्‍टोबरपर्यंत)

 • तालुका - पहिला डोस - दुसरा डोस

 • अक्‍कलकोट - 1,14,353 - 39,993

 • बार्शी - 1,91,040 - 54,210

 • करमाळा - 1,08,092 - 25,366

 • माढा - 1,45,017 - 40,313

 • माळशिरस - 2,02,117 - 51,129

 • दक्षिण सोलापूर - 1,08,763 - 28,860

 • मंगळवेढा - 65,797 - 21,304

 • मोहोळ - 94181 - 24,708

 • उत्तर सोलापूर - 40,468 - 10,646

 • सांगोला - 94,212 - 28,485

 • महापालिका - 4,15,939 - 1,77,179

हेही वाचा: प्रशासक नियुक्तीत मंत्र्यांना हस्तक्षेपाचा अधिकार आहे का?

कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचल्यावर कोरोना झालेले काहीजण आहेत. परंतु लसीचे दोन्ही डोस टोचून घेतलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सर्वांनी लस टोचून घ्यावी, जेणेकरून स्वत:बरोबरच कुटुंबही सुरक्षित राहील.

- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्याधिकारी, सोलापूर

loading image
go to top