esakal | Success Story : 'माझी मुलगी एक ना एक दिवस कलेक्‍टर होणारच!' वडिलांचे स्वप्न केले साकार
sakal

बोलून बातमी शोधा

मनीषा आव्हाळे

ग्रामीण भागातील युवक-युवतींनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेत नियोजनपूर्वक अभ्यास केल्यास त्यांना यश निश्‍चित मिळेल, असा विश्वास मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केला.

'माझी मुलगी कलेक्‍टर होणारच!' वडिलांचे स्वप्न केले साकार

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : माझी मुलगी एक ना एक दिवस कलेक्‍टर (Collector) होणारच, हे माझ्या लहानपणी वडिलांनी पाहिलेले स्वप्न. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेला संघर्ष, त्यातूनच मला यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बळ मिळाले. पहिल्या प्रयत्नात मी 833 रॅंकने उत्तीर्ण झाले. आपली मुलगी कलेक्‍टर होऊ शकत नाही, हे वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला वाशिमवरून पुन्हा दिल्लीला पाठविले आणि कलेक्‍टर होऊनच गावाकडे ये, असा आशीर्वाद दिला.

2018 च्या परीक्षेत मी देशात 33 व्या रॅंकने उत्तीर्ण झाले. वडिलांच्या प्रेरणेमुळे 833 वरून मला 33 वी रॅंक मिळाल्याची माहिती सोलापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी (Assistant Collector) तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सोलापूरच्या प्रकल्प अधिकारी मनीषा आव्हाळे (Manisha Awhale) यांनी 'कॉफी विथ सकाळ'मध्ये (Coffee With Sakal) दिली. 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी (Abhay Diwanji) यांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा: Jobs : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत 3261 सरकारी नोकऱ्या!

आई-वडिलांचे आजारपण आणि यूपीएससीची तयारी

माझ्या वडिलांना स्वत: शिकण्याची खूप इच्छा होती. त्यांच्या भावांना आणि बहिणींना शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले. उच्चशिक्षित होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिले. इयत्ता चौथीनंतर माझे शिक्षण धुळे, राहता, पुणे अशा विविध शहरातील बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. पुण्यातील आयएएलएस लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी घेतल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी वडिलांनी मला दिल्लीला पाठविले.

पहिल्याच प्रयत्नात मला 833 वी रॅंक मिळाली. मात्र, ही परीक्षा देत असताना माझे वडील आजारी पडले. त्यांना उपचारासाठी अकोल्यावरून पुण्यात आणण्यात आले. तब्बल दोन महिने ते आयसीयूमध्ये होते. मुख्य परीक्षेचा निकाल लागला तेव्हा मला माहितीही नव्हते. आठ दिवसांनी मी माझा निकाल बघितला. मुख्य परीक्षेचा अभ्यास एक महिन्यात करून मी परीक्षा दिली. दरम्यानच्या काळात आईलाही कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाने यूपीएससी नाही तर आयुष्याच्या परीक्षेला तोंड देऊन रॅंक मिळविला होता. आयुष्यातील हा क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचेही सहाय्यक जिल्हाधिकारी आव्हाळे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था भक्कमच हवी

सर्वसामान्य कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्यांच्या आयुष्यात त्यांनी जमवलेली सर्व बचत एका आजारपणामुळे नाहीशी होऊ शकते. माझ्या आई-वडिलांच्या आजारपणात आईच्या आजारपणात मला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व प्रकर्षाने जाणवले. सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था भक्कम असणे हे खूप महत्त्वाचे आहे. तसेच महिलांचे प्रश्न असो वा पाणी टंचाईचे, प्रत्येक विभागाचे आपापले प्रश्न असतात. ते समजून घेऊन ते सोडविणे गरचेजे असते. सोशल मीडियाच्या युगात मला पडद्याआड काम करायला आवडेल.

लोकसेवा हा माझा धर्म असून माझ्या कामाचा अविभाज्य भाग असणारा तो पैलू आहे. ग्रामीण भागातील मुलांना सामाजिक प्रश्नांची प्रामुख्याने जाणीव असते, कारण त्यांनी ते प्रश्न फार जवळून पाहिलेले असतात, सोसलेले असतात. प्रशासकीय सेवेत मी त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन त्याच्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही सहाय्यक जिल्हाधिकारी आव्हाळे यांनी सांगितले.

न्यूनगंड बाळगू नका, नियोजनपूर्वक अभ्यास करा

मला इंग्रजी जमत नाही, मी यूपीएससी परीक्षा पास होईल का? यासह अनेक प्रश्न ग्रामीण भागातील युवक-युवतींच्या मनात असतात. ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो, त्यातूनच त्यांची चांगली जडणघडण होते. त्यांच्यात निर्णयक्षमता तयार होते. ग्रामीण भागातील युवक-युवतींनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेत नियोजनपूर्वक अभ्यास केल्यास त्यांना यश निश्‍चित मिळेल, असा विश्वासही सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केला.

लोकप्रतिनिधी व्यवस्थेचे घटक

आपल्याकडे असलेल्या लोकशाही पद्धतीत लोकप्रतिनिधी हे देखील आपल्या व्यवस्थेचेच एक घटक आहेत. ते जनतेच्या कामासाठी अधिकाऱ्यांना फोन करतात, त्याला आपण नेहमीच प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप असणार असे म्हणू शकत नाही. त्यांनी केलेला संवाद हे ऐकून घेणे तेवढेच गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात संवाद असेल तर टोकाची भूमिका घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सांगितले.

हेही वाचा: नवरात्रोत्सवात मिरवणुकीला परवानगी नाहीच! जाणून घ्या नियमावली

आदिवासी प्रकल्पात मिशन आरंभ

एकात्मिक आदिवासी प्रकल्प हाताळताना बऱ्याच गोष्टी समोर आल्या. नवीन स्वरूपाने शिकायला मिळाल्या. विकास हा सर्वांगीण असतो. ज्या कार्यालयामार्फत घडवून आणायचा आहे, तिथले कर्मचाऱ्यांना त्या गोष्टीची, त्या समस्याची जाणीव असणे गरजेचे असते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सोलापूर कार्यालयांतर्गत उस्मानाबाद व सोलापूर हे दोन जिल्हे येतात. या कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. ज्या गावात अनुसूचित जमातीचे लोक आहेत त्या गावात प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी पोचले पाहिजेत यासाठीही माझा प्रयत्न आहे.

अनुसूचित जमातीसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थींना पोचण्यासाठी माझे विशेष प्रयत्न राहणार. मिशन आरंभ हा एक नवीन उपक्रम प्रकल्प कार्यालयाने हाती घेतला आहे. त्यामध्ये प्रत्येक पारधी कुटुंबाचा सर्वंकष सर्व्हे होणार आहे. त्यातून मिळणाऱ्या माहितीचे विश्‍लेषण करून शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व इतर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाय फक्त काही मोजकेच लोक आतापर्यंत लाभ घेताना दिसतात. त्यालाही त्यामुळे पायबंद बसणार असल्याचे मनीषा आव्हाळे यांनी सांगितले.

loading image
go to top