गुन्हेगारांवर आता ‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर! नगरसेवकांच्या वॉर्डवाईज निधीतून ६७ चौकांत सीसीटीव्ही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV
गुन्हेगारांवर आता ‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर! नगरसेवकांच्या वॉर्डवाईज निधीतून ६७ चौकांत सीसीटीव्ही

गुन्हेगारांवर आता ‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर! नगरसेवकांच्या वॉर्डवाईज निधीतून ६७ चौकांत सीसीटीव्ही

सोलापूर : दयानंद कॉलेजजवळील अपघातात तरुणाचा मृत्यू, छत्रपती शिवाजी चौकात वृद्धाची लूट, बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या बहुतेक दुचाकी चोरींचा आणि काही घरफोडींचा तपास अजूनही सुरूच आहे. सीसीटीव्ही ज्या ठिकाणी होते, तेथील गुन्ह्यांचा तपास काही दिवसांत मार्गी लागला. शहराची सुरक्षितता व सुव्यवस्थेसाठी आता नगरसेवकांच्या वॉर्डवाईज निधीतून महापालिका व स्मार्ट सिटीतून ४०७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत.

शहरात प्रवेश केलेली वाहने किंवा व्यक्ती शहरातून बाहेर पडतात. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्या प्रत्येक वाहनावर, व्यक्तीवर सीसीटीव्हीचा वॉच काळाची गरज आहे. पण, सोलापूर शहरात बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत तथा अत्यल्प आहेत. महापालिकेने संभाजीराजे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा ठिकाणी कॅमेरे बसविले. पण, त्यातील बहुतेक कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्हींची संख्या खूपच कमी आहे. शहरात घरफोडी, दुचाकी चोरी अशा घटना वाढत आहेत. नागरिकांना अनेकदा आवाहन करूनही हाउसिंग सोसायट्या, मोठमोठ्या अपार्टमेंट्‌समध्ये अद्याप सीसीटीव्ही नाहीत. शहराचा विस्तार वाढला, लोकसंख्या वाढली, पण पोलिस ठाणे व मनुष्यबळ तेवढेच आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज असून, सर्वांनी ते बसवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘एक घर-एक सीसीटीव्ही’ची गरज

शहरातून मागील नऊ महिन्यांत जवळपास दीडशे दुचाकींची चोरी झाली. शंभरपेक्षा अधिक ठिकाणी घरफोडी झाली. ५० हून अधिकजणांचा अपघाती मृत्यू झाला. पण, खबऱ्यांच्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांचा तपास लागला आहे. सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांना तपासात अनेकदा अडचणी आल्या. त्याना खूप मेहनत करावी लागली. पण, ‘एक घर-एक सीसीटीव्ही’ ही संकल्पना प्रत्येक दुकानदार तथा व्यापाऱ्यांनी, अपार्टमेंट व, हाउसिंग सोसायटीतील व्यक्तींनी प्रत्यक्षात उतरविली तर गुन्ह्यांचे प्रमाण खूप कमी होईल, असा विश्वास शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सीसीटीव्ही काळाची गरज

बाजार समिती, खासगी बॅंका, मोठे व्यापारी, दुकानदारांनी दुकानात सीसीटीव्ही लावले. पण, बाहेरील बाजूला कॅमेरे लावताना शटरवर लावले आहेत. रस्त्याच्या बाजूला त्याची दिशा असायला हवी. हाउसिंग सोसायट्या, मोठ्या अपार्टमेंट्‌समध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीची मोठी गरज आहे. चोरीचे प्रकार व गुन्हेगारांची शैली बदलल्याने सीसीटीव्हीचा मोठा फायदा पोलिसांना होतो. त्यामुळे सर्वांनी सीसीटीव्ही लावावेत.

- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर

सीसीटीव्हीची शहरातील स्थिती

  • खासगी कॅमेरे (अंदाजित)

  • २,७००

  • महापालिकेचे सीसीटीव्ही

  • ३३८

  • पोलिस ठाण्यातील कॅमेरे

  • ७४

  • बसविले जाणारे कॅमेरे

  • १३०