esakal | सख्ख्या भावांकडून बापाचा खून! आत्महत्येचा बनाव करून अंत्यसंस्कारही उरकले
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

सख्ख्या भावांकडून बापाचा खून! आत्महत्येचा बनाव करून अंत्यसंस्कारही उरकले

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील वरकुटे (मूर्तीचे) येथे आईला सतत त्रास देणाऱ्या व घरात भांडण करणाऱ्या बापाचा दोन सख्ख्या भावांनी गळफास देऊन खून करून अंत्यसंस्कारही केल्याची घटना उघड झाली आहे. हा प्रकार 7 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता घडला.

या प्रकरणी पोलिस नाईक श्रीकांत शहाजी हराळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की 13 एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता पोलिस स्टेशनला असताना एका खासगी व्यक्तीमार्फत वरकुटे येथे मुलांनी वडिलाचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी स्वत: व पोलिस उपनिरीक्षक तानाजी पवार आम्ही वरकुटे येथे जाऊन माहिती घेतली असता, भैरू भागवत जगताप (वय 55, रा. वरकुटे) याचा मृत्यू होऊन 8 एप्रिलला पहाटे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे समजले. त्यानंतर भैरू जगताप याचा मोठा मुलगा निखिल याला चौकशीसाठी बोलाविले, परंतु त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

हेही वाचा : कोरोना मृतदेहांच्या सततच्या अंत्यविधींमुळे होतेय विद्युतदाहिनीची झीज !

त्यानंतर त्याची सविस्तर चौकशी केली. या वेळी निखिलने सांगितले की, माझे वडील आडदांड होते. आईला सतत शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करायचे. आम्हालाही शिवीगाळी देऊन दमदाटी करायचे. माझे लग्न 16 फेब्रुवारी 2021 रोजी झाले. त्या लग्नाला माझ्या मामाला बोलवायचे नाही, अशी धमकी दिली होती. परंतु माझा भाऊ अक्षय याने मामाला बोलावले होते. त्याचा राग माझ्या वडिलांना होता.

7 एप्रिलला सायंकाळी साडेदहा वाजता आम्ही सर्व घरात झोपलो असताना, माझ्या आईचा ओरडण्याचा आवाज आला. त्या वेळी मी व माझा भाऊ तेथे गेलो असता, वडील "तुझा भाऊ लग्नाला कसा आला' असे म्हणून आईला मारहाण करत होते. आम्ही सोडवायचा प्रयत्न केला असता, त्या दोघांना आवरत नव्हते. त्यानंतर माझी आई अविणा व पत्नी प्रियंका या शेजाऱ्यांना बोलविण्यासाठी गेल्या. त्यानंतर संशयित आरोपी निखिल जगताप व अक्षय जगातप या दोघांनी भैरू जगताप यास जबरदस्तीने पकडून त्याचे दोरीने पाय बांधून भैरू जगताप याच्या गळ्याभोवती दोरीचा फास गुंडाळला व तो आवळून त्यास फरपटत घराबाजूला असलेल्या झाडाजवळ घेऊन जाऊन पुन्हा त्याच्या गळ्या भोवतीचा दोरीने फास आवळून त्याचा खून केला. भैरू जगताप याने झाडाला गळफास घेतल्याचे दृष्य निर्माण केले. यानंतर लोक जमा झाल्यावर संशयित आरोपी मोठमोठ्याने रडले. त्यामुळे कुणाला शंका आली नाही. मात्र एका फोननंतर सर्व चक्र फिरले आणि मुलांनी वडिलांचा खून केल्याची घटना समोर आली.