esakal | Solapur: माढा तालुक्यातील निर्बंध तातडीने हटविण्याची मागणी: व्यापारी महासंघ टेंभुर्णी
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

सध्या माढा तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून तालुक्यात दररोज बोटावर मोजण्याइतके कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडत आहेत.

माढा तालुक्यातील निर्बंध तातडीने हटविण्याची मागणी

sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर): माढा तालुक्यातील कोरोना विषाणूची साथ आटोक्यात आली असून आता कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या खूप कमी झाली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लावलेले निर्बंध सर्वत्र हटविण्यात येत आहेत. माढा तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसायांवर लागू केलेले निर्बंध थोडे शिथील केले असले तरी अद्याप पूर्णपणे हटविलेले नाहीत. सध्या माढा तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून तालुक्यात दररोज बोटावर मोजण्याइतके कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडत आहेत. शारदीय नवरात्र उत्सवासारखे सणासुदीचे दिवस जवळ आल्याने माढा तालुक्यातील व्यवसायांवर असलेले निर्बंध तातडीने हटविण्याची मागणी येथील व्यापारी महासंघाकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: परदेशात लांबोटी चिवड्याचा ब्रॅण्ड! रुक्‍मिणीबाईंची अविस्मरणीय कामगिरी

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, सांगोला, करमाळा या पाच तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुरूवातीला कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी या पाच तालुक्यात सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत व्यवसाय सुरू ठेवण्याबाबत आदेश दिले होते. आमदार बबनराव शिंदे यांनी माढा तालुक्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्याची मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली होती. यानंतर प्रशासनाने दुपारी चार ऐवजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतची वेळ वाढवून दिली. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसायांवरील बंदी कायम ठेवली आहे.

हेही वाचा: शंभर टक्‍क्‍यांच्या उंबरठ्यावर उजनी धरण! बळीराजाची मिटली चिंता

माढा तालुक्यातील टेंभुर्णी, कुर्डूवाडी, मोडनिंब, माढा येथे मोठी बाजारपेठ आहे. सोमवारी ( ता. 4) पासून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालक व विद्यार्थ्यांची लगबग दिसून येत आहे. गुरूवार ( ता. 7) पासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. शिवाय माढा तालुक्यातील अर्थकारणाचा कणा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या येण्यास सुरुवात होईल. किराणा साहित्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे आदी खरेदी करण्यासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंतची वेळ अगोदरच अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे शेतकरी, व्यापारी, छोटे व्यावसायिक यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक दुकानदारांना दंडात्मक कारवाई सामोरे जाऊन आर्थिक भुर्दंड नाईलाजाने सहन करावा लागत आहे. माढा तालुक्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आली असून गेल्या पाच दिवसापासून माढा तालुक्यात दहा ते पंधरा कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून येत आहेत. तसेच सणासुदीचे दिवस असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी माढा तालुक्यातील व्यवसायांवर असलेले निर्बंध हटविण्याची मागणी व्यक्त होत आहे.

हेही वाचा: नोव्हेंबरमध्ये 19 हजार पदांची भरती! आठवड्यात 'MPSC'ला मागणीपत्र

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद असल्याने अनेक व्यापाऱ्यांची बँक खाते एनपीएमध्ये गेली आहेत. त्यामुळे बँकांचा कर्ज वसुलीसाठी तगादा आहे. व्यापाऱ्यांची देणी थकल्याने त्यांची बाजारपेठेतील पत खालावली आहे. सध्या व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून आठवड्यातील पाच दिवस दुकाने उघडण्यास परवानगी असल्याने व्यापाऱ्यांना दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार, घरखर्च, वीजबिल, व्यापाऱ्यांची देणी भागविणे मुश्किल झाले आहे. कोरोना काळात व्यापाऱ्यांनी शासनास सहकार्य केले आहे. आता माढा तालुक्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने प्रशासनाने तातडीने निर्बंध हटविणे आवश्यक आहे.

- गोरख देशमुख व मदन शहा, टेंभुर्णी व्यापारी महासंघ

loading image
go to top