esakal | भोसरे येथील सात दुकाने आगीत जळून खाक ! सुमारे 25 लाखांचे नुकसान

बोलून बातमी शोधा

Fire
भोसरे येथील सात दुकाने आगीत जळून खाक ! सुमारे 25 लाखांचे नुकसान
sakal_logo
By
वसंत कांबळे

कुर्डू (सोलापूर) : कुर्डुवाडी - बार्शी रोडवरील भोसरे (ता. माढा) येथील परांडा चौकात एमएसईबीच्या सब स्टेशनजवळील सात दुकाने शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे; मात्र जीवित हानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी (ता. 23) पहाटेच्या सुमारास घडली.

शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. या घटनेची माहिती फोनवरून पोलिस व नगरपालिका यांना दिल्याने तातडीने विठ्ठल शुगर, म्हैसगाव, कुर्डुवाडी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन रौद्ररूप धारण केलेली आग आटोक्‍यात आणली. यासाठी परांडा चौकातील युवकांनी सहकार्य केले.

या दुर्घटनेत राहुल अभिमन्यू माने (हॉटेल), सिद्धेश्वर गवळी (हॉटेल), अंकुश ढेरे मेजर (टेलरिंगचे दुकान), तन्वीर शेख (पंक्‍चरचे दुकान), संजय काशीद (हेअर सलूनचे दुकान), अश्‍फाक शेख (चिकन सेंटर) व आदलिंगे यांच्या सायकल दुकानासह व्यसनमुक्ती केंद्र अशा एकूण सात दुकानांचे या आगीत मोठे नुकसान झाले. सुमारे पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याचा व्यक्त करण्यात आला. आग कशी लागली, याचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन घडलेल्या घटनेची पाहणी केली.