esakal | "दोन डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका नाहीच ! कोरोना झाल्यानंतरही होत नाही रुग्ण गंभीर'

बोलून बातमी शोधा

Vaccination
"दोन डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका नाहीच ! कोरोना झाल्यानंतरही होत नाही रुग्ण गंभीर'
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यात लसीकरण सुरू झाल्यापासून (16 जानेवारी) 22 लाख 93 हजार रुग्ण वाढले आहेत. त्यातील 12 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील आठशे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतल्यानंतर अनेकांना कोरोनाची पुन्हा बाधा झाली. परंतु, दोन डोस घेतलेल्या कोणत्याच रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे.

राज्यात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरवात झाली असून, आतापर्यंत दीड कोटीहून अधिक व्यक्‍तींनी लस टोचून घेतली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख 59 हजार व्यक्‍तींचा समावेश असून, वैद्यकीय कर्मचारी, फ्रंटलाइनवरील कर्मचारी, को- मॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेले) आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी 39 हजार 768 व्यक्‍तींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील मृत्यूदर वाढत असतानाच दररोज सरासरी 35 ते 40 रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे. शहरातील मृत्यूची संख्या एक हजारावर तर ग्रामीणची मृत्यू संख्या दीड हजारावर गेली आहे.

हेही वाचा: पालकमंत्र्यांची पोलिस बंदोबस्तात बैठक ! बंदोबस्ताचे "हे' होते कारण

कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते तर दोन महिन्यांत दुसरा डोस घेतल्यानंतर पुढील काही दिवसांत शरीरातील रोगप्रतिकारक शक्‍ती टिकून राहते. त्यामुळे त्यांना पुन्हा कोरोना झाला, तरीही त्याला ऑक्‍सिजन तथा व्हेंटिलेटरची गरज पडत नाही. दुसरीकडे, त्या रुग्णाला शक्‍यतो कोणताही गंभीर स्वरूपाचा आजार होत नाही, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

दोन डोस घेतल्यानंतर मृत्यू होत नाहीच

एक डोस घेतलेल्यांपेक्षा दोन डोस घेतलेल्या एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. त्या व्यक्‍तीला पुन्हा कोरोना झाला तर तो सहजपणे त्यावर मात करू शकतो. त्यामुळे लसीकरण खूप गरजेचे असून प्रत्येकाने लस टोचून घ्यायला हवी.

- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

केंद्राच्या मार्गदर्शक सूचना...

  • 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोफत नाहीच

  • ज्या खासगी रुग्णालयात निरीक्षण कक्ष मोठा आहे, वेटिंगची सोय आहे अशा ठिकाणीाच लसीकरण

  • लेखी संमती देणाऱ्या खासगी रुग्णालयांमध्येच सुरू करावे लसीकरण केंद्र

  • लसीकरण केंद्र सुरू करण्यास पात्र असलेल्या खासगी रुग्णालयांची द्यावी 28 एप्रिलपर्यंत माहिती

  • 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या व्यक्‍तींच्या लसीचा दर राज्य शासनाने ठरवावा

  • गर्दी टाळण्यासाठी स्वत:हून ऑनलाइन नोंदणी करून अपॉइंटमेंट घेऊनच टोचली जाणार लस