esakal | Solapur : बालक हरवून 96 तास झाले, शोध मात्र लागेना! अफवांना ऊत
sakal

बोलून बातमी शोधा

बालक हरवून 96 तास झाले, शोध मात्र लागेना

वैराग (ता. बार्शी) येथून शनिवारी (ता. 2) दुपारी साडेतीन वाजता एक बालक हरवला आहे.

बालक हरवून 96 तास झाले, शोध मात्र लागेना! अफवांना ऊत

sakal_logo
By
रमेश दास

वाळूज (सोलापूर) : वैराग (ता. बार्शी) (Vairag, taluka Barshi) येथून शनिवारी (ता. 2) दुपारी साडेतीन वाजता एक बालक हरवला आहे. त्या हरवलेल्या बालकाचा अद्याप शोध लागलेला नसून त्याचे दप्तर घराजवळील वाहनात सापडले आहे. त्यामुळे त्याचे अपहरण झाले की काय? यासह इतर अफवांना वाळूजसह वैराग परिसरात जोर आला आहे.

शिवराज जोतिराम सुतार (वय 8, मूळ गाव वाळूज, ता. मोहोळ) असे हरवलेल्या मुलाचे नाव असून, शनिवारी (ता. 2) दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान तो गायब झाला आहे. या आठ वर्षाच्या बालकाचा आज बुधवारीही (ता. 6) (96 तासांनंतरही) तपास लागलेला नाही. या घटनेनंतर वाळूजसह वैराग भागात अफवांना जोर आला आहे. पोलिस सर्व शक्‍यता पडताळून पाहात आहेत.

हेही वाचा: दर्शनाच्या ऑनलाइन पाससाठी दोन्ही डोसचे बंधन! जाणून घ्या नवे नियम

आई, वडील कामावर गेल्याने तर घरी एकटाच असलेला शिवराज शनिवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून गायब झाला आहे. तो राहात असलेल्या गल्लीतील एका वाहनात त्याचे दप्तर सापडले आहे. पोलिसांनी सुतार दाम्पत्याच्या एका परिचिताला ताब्यात घेतले आहे. त्या दिवशी शिकवणीला सुटी होती. त्यामुळे शिवराज तिकडे गेलाच नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. नातेवाइकांकडे, परिचितांपैकी कोणाकडेही तो गेलेला नाही. त्याला गावतळ्याजवळ शेवटचे पाहण्यात आल्याचे काहीजणांनी सांगितले, मात्र तळ्याकडे जाणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो तिकडे गेल्याचे दिसत नाही.

शिवराज गायब झाल्याचे समजल्यानंतर शोधकार्यासाठी आलेल्या एका परिचिताला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. सुतार दाम्पत्य हे गरीब असल्यामुळे त्याचे खंडणीसाठी अपहरण झाल्याची शक्‍यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिस इतर शक्‍यता पडताळून पाहात आहेत. त्याने सकाळी वडिलांकडून शिकवणीची फी देण्यासाठी म्हणून शंभर रुपये घेतले होते; मात्र तो शिकवणीस जात असलेल्या शिक्षिकेचा त्याच दिवशी वाढदिवस असल्यामुळे त्यांनी शिकवणीस सुटी दिली होती. त्यामुळे तो तिकडे गेलाच नव्हता. मात्र तो राहात असलेल्या गल्लीतील एका वाहनामध्ये त्याचे दप्तर आढळून आले आहे. या वाहनाच्या मालकाला दप्तर तिथे कसे आले, याबाबत विचारले असता, आपल्याला काहीही माहीत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

तपासाधिकारी राजेंद्र राठोड आणि त्यांचे सहकारी या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. शिवराजच्या आई- वडिलांना घेऊन त्यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजे वाळूज (ता. मोहोळ) येथे जाऊन चौकशी केली असता, तो वाळूजला आलाच नाही, असे सांगण्यात आले.

हेही वाचा: महावितरणचे 'स्मार्ट मीटर'! आता ग्राहकांना मिळणार प्रीपेड वीज

आम्ही सध्या या प्रकरणासंदर्भात सर्व शक्‍यता पडताळून पाहात आहोत. बेंबळे, गडशिंगे (ता. जि. उस्मानाबाद) येथे याच तपासासाठी आलो आहोत. यापूर्वीही तो एकदा असाच वाळूजला आला होता व एका देवळात गेलेला होता.

- राजेंद्र राठोड, तपासाधिकारी, वैराग पोलिस ठाणे

loading image
go to top