esakal | पालकांनो, मुलांची घ्या काळजी ! जिल्ह्यातील कोरोनाबाधित बालकांनी ओलांडला दहा हजारांचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

आतापर्यंत शहर- जिल्ह्यातील दहा हजार पाच बालकांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालके सुपर स्प्रेडर ठरतील, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित बालकांनी ओलांडला दहा हजारांचा टप्पा !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट (Second wave of Corona) आटोक्‍यात येण्याची आशा असतानाच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे. तत्पूर्वी, आतापर्यंत शहर- जिल्ह्यातील दहा हजार पाच बालकांना (0 ते 15 वयोगट) कोरोनाची बाधा झाली (Children affected by corona) असून, त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शहरातील दोन तर ग्रामीणमधील तीन जणांचा समावेश आहे. (The number of children affected by corona in Solapur district is over ten thousand)

हेही वाचा: का होतो "म्युकरमायकोसिस'? जिल्ह्यात 157 पैकी सात रुग्णांचा मृत्यू

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालके सुपर स्प्रेडर ठरतील, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे बालकांना ज्येष्ठांपासून दूर ठेवा, त्यांना खेळात गुंतवा, कुटुंबातील सदस्यांपासूनही दूर ठेवून विलगीकरणात ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविल्यानंतर महापालिकेने त्यांच्याकडील 15 नागरी आरोग्य केंद्रात बालकांच्या उपचाराची सोय करण्याचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी, दुसऱ्या लाटेपर्यंत शहर-जिल्ह्यातील कोरोना बाधित बालकांनी दहा हजारांचा टप्पा पार केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता राखण्याचे आवाहन आरोग्य विभागाने पालकांना केले आहे. आतापर्यंत शहरातील एक हजार 725 तर ग्रामीणमधील आठ हजार 280 बालकांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील बहुतेक मुले कोरोनातून बरी झाली आहेत. तर काही मुलांवर उपचार सुरू आहेत, परंतु पाच जणांना जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा: पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू! नंदूर येथील घटना

ग्रामीण रुग्णालयात बालकांवर उपचार

तिसऱ्या लाटेत सर्वाधिक बाधित बालके असतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बालकांवरील उपचारासाठी आता जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, त्या ठिकाणी बालरोगतज्ज्ञांच्या रिक्‍त पदांची संख्या मोठी असल्याने त्या ठिकाणी दर्जेदार उपचार होतील का, असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे. तर महापालिकेने शहरातील नागरी आरोग्य केंद्रातून उपचाराची घोषणा केली. परंतु, त्यानुसार अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही.

बाधित बालकांची सद्य:स्थिती (0 ते 15 वयोगट)

  • मुले बाधित : 5,869

  • मुली बाधित : 4,336

  • एकूण बाधित : 10,005

  • एकूण मृत्यू : 5

loading image
go to top