esakal | माळशिरसमधील रुग्णवाढ विदारक ! दवाखाने व कोव्हिड सेंटर फुल्ल; मृत्यूदरही वाढला

बोलून बातमी शोधा

Corona
माळशिरसमधील रुग्णवाढ विदारक ! दवाखाने व कोव्हिड सेंटर फुल्ल; मृत्यूदरही वाढला
sakal_logo
By
मिलिंद गिरमे

लवंग (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य तज्ज्ञांची उपचारासाठी दमछाक होत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण दवाखान्यात दाखल होण्याचे वाढते प्रमाण पाहून चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्‍यातील दवाखाने आणि अकलूज व महाळुंग येथील कोव्हिड सेंटर अपुरे पडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत सरासरी रोज 94 रुग्ण दाखल होऊन आजअखेर 1 हजार 418 कोरोना बाधित रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत.

नागरिक आजही कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याने आणि कोरोनाची लक्षणे असतानाही अंगावर दुखणे काढण्याचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. तालुक्‍यात 15 दिवसांत 30 मृत्यू झाल्याने वाढत असलेला मृत्यूदर पाहता भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध होत नसल्याने कोरोना रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची बेड मिळवण्यासाठी धावपळ होत असून, नातेवाईक बेडसाठी कासावीस होत असल्याचे प्रसंग पाहावयास मिळते आहे. सहा एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंतच्या आरोग्य खात्याच्या रिपोर्टनुसार गेल्या पंधरा दिवसांत दररोज सरासरी 94 उपचारासाठी दाखल होत आहेत. तर गेल्या 15 दिवसांत 30 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 20 एप्रिलपर्यंत 160 वरून 1 हजार 578 रुग्णांची संख्या झाली आहे. पंधरा दिवसांतच 1 हजार 418 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील दवाखाने व कोव्हिड सेंटर अपुरे पडत आहेत.

हेही वाचा: डॉक्‍टरचा दिलदारपणा ! उद्‌घाटनापूर्वीच दिले हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी

माळशिरस तालुक्‍यात कोरोनावर उपचार घेत असलेले 1 हजार 578 हे रुग्ण होम आयसोलेशन, कोव्हिड सेंटर आणि खासगी दवाखान्यातील आहेत. यामध्ये शेजारच्या तालुक्‍यातील काही रुग्ण आहेत. तालुका आरोग्य खात्यामार्फत चेस द व्हायरस मोहिमेंतर्गत गेल्या वीस दिवसांत गावोगावी, घरी जाऊन 20 हजार टेस्ट केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येते. लोकांनी स्वतःहून टेस्टिंगसाठी आले पाहिजे. ऑक्‍सिजनची वेळ येईपर्यंत अंगावर आजार काढू नये. तरुण मुलांनी काळजी घ्यावी, तरुणांनाही या व्हायरसची लागण होते.

- डॉ. रामचंद्र मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी, माळशिरस