esakal | डॉक्‍टरचा दिलदारपणा ! उद्‌घाटनापूर्वीच दिले हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी

बोलून बातमी शोधा

Dr. Amjad Sayyad

डॉक्‍टरचा दिलदारपणा ! उद्‌घाटनापूर्वीच दिले हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : शहरातील जवळपास 50 तर ग्रामीण भागातील 70 हून अधिक खासगी व सरकारी रुग्णालयांमधून कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. शहर-जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 80 हजारांवर गेली आहे तर मृत्यूची संख्या अडीच हजारांच्या उंबरठ्यावर आहे. शासकीय रुग्णालयांची कमतरता असल्याने रुग्णांना लाखो रुपयांचा खर्च करून खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत असल्याचेही चित्र सध्या दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी सर्वसामान्यांवर उपचार होणाऱ्या रुग्णालयांमध्ये बेड नाही, हे ओळखून व सामाजिक जाणिवेतून सोलापूरच्या एका डॉक्‍टराने त्यांच्या नव्याने उभारलेले सहा मजली हॉस्पिटल, ज्याचे अजून उद्‌घाटनही झाले नाही, ते कोरोना रुग्णांसाठी महापालिका प्रशासनाला दिले आहे. कोरोना संकट काळात दाता ठरलेल्या या डॉक्‍टरांच्या दिलदारपणाचे सर्व स्तरांतून कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.

अमजद सय्यद असे या डॉक्‍टरांचे नाव असून, ते हृदयरोग तज्ज्ञ आहेत. सोलापूर शहरातील पद्मशाली चौकात त्यांनी नव्याने "नोबेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर' नावाने सहा मजली हॉस्पिटलची उभारणी केली आहे. त्याचा सेटअप अजून सुरू आहे. मात्र, सध्याची कोरोनाची स्थिती पाहता व हॉस्पिटल व बेड मिळत नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय पाहता, या दवाखान्याचे शानदार उद्‌घाटन करण्याचे बाजूला ठेवून त्यांनी आपले रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी महापालिका प्रशासनाला दिले आहे. सध्या या हॉस्पिटलमध्ये 25 ऑक्‍सिजनचे बेड तयार असून, त्या सर्व बेडवर कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: सोलापूरला लागतोय दररोज 41 मे.टन ऑक्‍सिजन! 11328 रुग्ण; आरोग्य सुविधा व्हेंटिलेटरवर

हे सर्वांचं कर्तव्य आहे, मी विशेष असे काही केलं नाही

आपल्या या कार्याबद्दल सांगताना डॉ. अमजद सय्यद म्हणतात, मी विशेष असं काही केलेलं नाही. अशा कठीण प्रसंगी सर्वांनी सर्वांना मदत करावी, हीच भावना ठेवून हे कार्य केलं आहे, त्यात मला विशेष असं काही वाटत नाही. ठीक आहे माझ्या हॉस्पिटलचा नवीन सेट- अप होता, आज ना उद्या त्याचे उद्‌घाटन होईलच. मात्र कोरोना रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या सेंटरसाठी कोणी कर्मचारी काम करायला तयार नव्हते, मी त्यांना मोटिव्हेट केलं आणि कोव्हिड सेंटर सुरू केलं. सगळेच करताहेत मी एकटाच नव्हे, अन्‌ सर्वांचं कर्तव्य आहे ते मी पार पाडतो. कोव्हिड सेंटरमध्ये कन्व्हर्ट करायला त्रास झाला. हॉस्पिटल सुरूच झालं नाही पण आम्ही स्वत:हून पुढाकार घेऊन हे केलं. महापालिकेचं सहकार्य मिळालं.