esakal | शहराला दिलासा, ग्रामीणची चिंता कायम ! आज आढळले 1723 रुग्ण; 29 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Corona
शहराला दिलासा, ग्रामीणची चिंता कायम ! आज आढळले 1723 रुग्ण; 29 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मागील काही दिवसांपासून शहर व ग्रामीण भागात मृत्यूची मालिका सुरूच आहे. मात्र, आज शहराला थोडासा दिलासा मिळाला असून दोन हजार 373 संशयितांमध्ये 289 जण पॉझिटिव्ह आले. नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 388 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दुसरीकडे, ग्रामीण भागात आज एक हजार 434 रुग्ण वाढले असून 20 जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. ग्रामीण भागाला थोडासा दिलासा म्हणजे आज 686 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहर- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थैमान घातले आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले आहे, परंतु रुग्णवाढ व मृत्यूदर चिंतेची बाब ठरत आहे. ज्येष्ठांसह को-मॉर्बिड रुग्ण व तरुण कोरोनाचे बळी ठरत आहेत. आज भाळवणीतील 32 वर्षीय महिलेचा तर जळोलीतील 44 वर्षीय पुरुषाचा (ता. पंढरपूर) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 49 वर्षीय महिलेसह 53 वर्षांवरील आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आता शहर-जिल्ह्याची रुग्णसंख्या 88 हजार 821 झाली असून मृतांची संख्या एक हजार 520 झाली आहे. लक्षणे असतानाही आजार अंगावर काढणाऱ्यांचा मृतांमध्ये सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची लक्षणे असल्यास स्वत:हून टेस्ट करून घ्यावी, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, स्वच्छता राखावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ठळक बाबी...

  • शहरात आज दोन हजार 373 संशयितांमध्ये आढळले 289 पॉझिटिव्ह

  • शहरातील 388 रुग्ण आज झाले बरे; रुग्णालयातील नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

  • आतापर्यंत शहरात आढळले 23 हजार 686 रुग्ण; एक हजार 11 जण ठरले कोरोनाचे बळी

  • शहरातील एकूण तीन हजार 532 रुग्णांवर सुरू आहेत उपचार; आतापर्यंत 19 हजार 143 झाले बरे

  • ग्रामीण भागात आज वाढले 1434 रुग्ण; 32 वर्षीय महिलेसह 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  • मंगळवेढ्यातील चार तर करमाळा, माळशिरस व दक्षिण सोलापुरातील प्रत्येकी तिघांचा मृत्यू